मुंबई - “करून दाखवले असे म्हणणा-यांनी आता पळून दाखवले आहे!”, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या विषयात महापौरांनी केलेल्या वक्तव्यावर लगावला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.
त्यांना आता जबाबदारी टाळता येणार नाही. मुंबईकरांसाठी नालेसफाई हा महत्वाचा विषय आहे. मी या विषयावर गेल्या महिनाभरा पुर्वीच कामाला सुरूवात केली आहे. प्रथम महापालिका आणि रेल्वेसहित दोन वेळा संयुक्त बैठक घेतल्या. तर प्रत्यक्ष नालेसफाईची दोन वेळा पाहणीही केली. त्याचा अहवाल ही माघ्यमांना त्यावेळी दिला होता. आजही आम्ही आमचे काम करीत आहोत. हे आज घराबाहेर पडले आणि पळ काढत आहेत.
नालेसफाईची जी कामे सुरू आहेत त्यामध्ये अजून स्पष्टता दिसून येत नाही. काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पुन्हा कामे का देण्यात आली?. जो गाळ काढला जात आहे त्याचे मोजमाप कुठे होते? त्याच्या पावत्या दाखवल्या जात नाहीत. ज्या खाजगी क्षेपण भूमीवर गाळ टाकला जातो आहे त्याचे सीसीटीव्ही व्दारे चित्रण केले जाते आहे का? जो कंत्राटदार काम करतो आहे त्याचे नाव व माहिती ज्या जागी काम सुरू आहे त्या जागी लावण्यात आलेली नाही. तसेच केलेल्या कामाची माहिती जाहीर का केली जात नाही? असे प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
युवासेना प्रमुखांनी नुकतीच पालिका आयुक्तांकडे एक बैठक घेतली. आम्हाला वाटले की, ती बैठक नालेसफाई व मान्सून पुर्व कामांची असावी, पण अधिकची माहिती घेतल्यानंतर समजले की,गच्चीवरील हॉटेल आणि रात्रीच्या पार्ट्यांना लायसन्स कसे मिळेल, गच्चीवरील हॉटेलना मान्सून शेड टाकता यावी म्हणून ही बैठक घेण्यात आली. त्यांना मान्सून शेडची चिंता वाटते, मान्सून पुर्व कामांची काळजी वाटत नाही, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
No comments:
Post a Comment