मुंबई - बदलत्या राहणीमानामुळे सद्या मधुमेह , उच्च रक्तदाब व हृदयविकार यासारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. पालिकेच्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट झाले होते. मुंबई महापालिका या आजारांवर जनजागृती अभियान राबवणार आहे. रेल्वे, रस्त्यांवर, बस थांब्यावर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर झाल्याने पुढील सहा महिने यावर प्रबोधन केले जाणार आहे.
बदललेल्या राहणीमानामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. हे आजार जीवघेणे असून त्याचे दुष्परिणाम कायमस्वरूपी माणसाच्या जीवावर होतात. हे आजार जेवढे धोकादायक आहेत. तेवढेच ते होऊ नये यासाठी करायचे प्रतिबंधात्मक उपायही सोपे आहेत. परंतु हे उपाय माणसाने अंगीकारणे त्याला प्रेरणा देणे आवश्यक आहे. यासाठी बदलत्या राहणीमानामुळे होणाऱ्या आजारांबाबत पालिकेने जनजागृती अभियान राबवण्याचा निर्णय़ घेतला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचे आगमन होईल. या पार्श्वभूमीवर मुंबईत लेप्टोपायरोसिस, मलेरिया, एच १ एन , डेंगी या आजारांबाबतही जनजागृती केली जाणार आहे. रेल्वे फलाटावर, रस्त्यावर, बसथांब्यावर होर्डिंग लावून जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून 62 लाख 20 हजार रुपये खर्च केला जाणार आहे.