मुंबई - कौटुंबिक कलहामुळे ग्रासलेल्या जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने वृद्धाश्रम सुरु करण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात होती. नगरसेवकांची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. मुंबईमधील 5 हेक्टर जागेवरील 27 भूखंडावर वृद्धाश्रम बांधले जाणार आहेत. तसा अभिप्राय पालिका आयुक्तांनी दिला आहे.
सध्याच्या वैज्ञानिक युगात वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत संशोधन व अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे मानवाच्या आयुर्मानात वाढ होत आहे. वाढत्या वयोमानाबरोबर उद्भवणाऱ्या वाढत्या शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्या जेष्ठ नागरिकांना भेडसावत असल्याने जेष्ठ नागरिकांना नैराश्य येते. समस्यांनी ग्रासलेल्या वृद्धांना आधार मिळावा म्हणून सामाजिक संस्थांकडून वृद्धाश्रम चालविण्यात येतात. मात्र बहुतांश वृद्धाश्रम मुंबई बाहेर असून त्यांची संख्या कमी आहे. त्यांचे मासिक शुल्क जास्त असल्याने सर्वाना आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे महापलिकने आपल्या भूखंडावर वृद्धाश्रम उभारावेत अशी मागणी माजी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. याबाबत अभिप्राय देताना विकास आराखड्यात 26 भूखंडावरील 5.08 हेक्टर क्षेत्रफळ जेष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. राज्य सरकारकडे आरखडा मंजुरीसाठी पाठवताना यात सुधारणा करून वृद्धश्रमासाठी 5.1 हेक्टर जागेवर 27 आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. ज्यामध्ये 3 नवीन आरक्षणे प्रस्तावित केली असून 2 आरक्षणे वगळण्यात आली आहेत. ही आरक्षणे खाजगी जमिनीवर असून विकास आरखडा मंजूर झाल्यावर विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीनुसार विकसित केली जातील असे आयुक्तांनी म्हटले आहे. दरम्यान नुकताच विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केल्याने मुंबईत वृद्धाश्रम बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
No comments:
Post a Comment