काँग्रेसचा समाजवादीला टोला
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेत नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांनी आपले जुने भिडू बदलून नव्या भिडूंना सोबत घेतले आहे. यामुळे एकीकडे शिवसेना आणि भाजपा आपसात भांडत असताना आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षात हमरीतुमरी सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. याला उत्तर देताना समाजवादी पक्षाचा गटनेता पालिकेत काय करतो याकडे लक्ष द्यावे म्हणजे काँग्रेसची बाजू समजेल असा टोला काँग्रसेच्या एका नेत्याने लगावला आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. कॉंग्रेस विरोधात सपामध्ये या निवडणुकीवरुन वाद रंगला आहे. ए - बी आणि ई प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने कॉंग्रेसला पांठिबा द्यावा लागू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी नगरसेवक गैरहजर राहिला. कोणाच्या इशाऱ्यावरून आणि कोणाला पाठिंबा देण्यासाठी हा प्रकार घडला, असे सांगत कॉंग्रेसने समाजवादी पार्टीवर रोष व्यक्त केला. एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी सन २०१२ पासून सलग तीन वर्षे काँग्रेसने सपाला साथ दिली. असे असताना समाजवादीकडून काँग्रेसला डावलण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांच्या प्रभागात ही समाजवादीने पालिकेच्या कामांचे उद्धाटन केले. ही घोसखोरी कोणाच्या इशाऱ्यावरुन झाली, या सर्व प्रश्नांची उत्तरे आझमी यांनी शोधल्यास एम-पूर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याचे कारण लक्षात येईल, असे कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. दरम्यान, पालिका मुख्यालयात विरोधी पक्ष म्हणून कोणीही एकसंघ नाही. समाजवादी पार्टीचे गटनेते भाजपच्या गोटात जाऊन बसले आहेत. स्थायी समितीत अनेकदा हे प्रकार दिसून येतात. मग त्यांनी इतर पक्षांकडून अपेक्षा ठेवावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
No comments:
Post a Comment