धोबीघाटवरील कारवाई विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2018

धोबीघाटवरील कारवाई विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

मुंबई - मुंबईमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोबीघाट परिसरात पालिकेने केलेल्या कारवाई विरोधात आज शिवसेनेने मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. 

महालक्ष्मी येथील 100 वर्षाहून जुन्या धोबीघाट परिसरातील धोबी व्यावसायिकांवर पालिकेकडून कारवाई सुरू आहे. धोबीघाट मधील काही जागा विकासकाला देण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धोबी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण गेल्या एक वर्षात पर्यायी जागा पालिकेने किंवा विकासकाने दिलेली नाही. पर्यायी जागा न देताच धोबीघाटसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे.

गरीब धोबी व्यावसिकांकवर कारवाई सुरू केल्याने शिवसेना त्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. धोबी व्यावसायिकांचे पुनर्वसन केल्याशिवाय किंवा त्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय कारवाई करू नये अशी मागणी शिवसेनेची आहे. मात्र या मागणीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करून कारवाई सुरू ठेवल्याने पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी दिला होता.

या इशाऱ्यानुसार आज सोमवारी शिवसेनेने स्थानिक आमदार सुनिल शिंदे व प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी सहाय्यक आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत कोर्टाचे आदेश असताना धोबी व्यावसिकांना पर्यायी जागा का देत नाही असा प्रश्न सहाय्यक आयुक्तांना विचारण्यात आला आहे. पालिका आयुक्त येत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. आंदोलनात माजी महापौर स्नेहल आंबेकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, शिवसैनिक व धोबी व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जे अनधिकृत आहे ते आम्ही पाडत आहोत. आतापर्यंत ६७ बांधकामे आम्ही तोडली आहेत. आता २ दिवस कारवाई बंद आहे. पालिका आयुक्तांसोबत बैठक झाल्यावर निर्णय घेऊ. पण, या धोबी बांधवांना फक्त परवाने हे कपडे धुण्यासाठी दिले आहेत. या भागात मोठी अनधिकृत बांधकाम आहेत. कमला मिल सारखी दुर्घटना होऊ नये, म्हणून ही कारवाई आम्ही करत आहोत.
- देवेंद्र कुमार जैन, सहायक आयुक्त (जी साऊथ)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad