मुंबई - दरवर्षी पावसाळयात मुंबईची तुंबई होते. मागीलवर्षी पालिकेने पाणी तुंबणार नाही असा दावा केल्यानंतरही मुंबई तुंबली होती.यंदाही नाले सफाईची कामे संथ गतीने सुरु असल्याने यंदाही 225 ठिकाणी पाणी तुबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी 208 जागांवर पाणी तुंबुन राहू नये म्हणून पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. तर उर्वरीत 17 ठिकाणांची जबाबदारी मेट्रो कॉर्पोरेशनवर सोपवण्यात आली आहे. पावसात पूरस्थिती निर्माण होणाऱ्या यातील काही भागातील महत्वाच्या ठिकाणांवर पालिकेच्या यंत्रणेचा विशेष लक्ष राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेचे पावसापूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण करण्यासाठी कामाला लागली आहे. आता पर्यंत 40 टक्के नाले सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो आहे. मात्र वांद्रे आणि काही भागातील नाल्यांची स्थिती पाहता अजूनही काही ठिकाणी समाधानकारक नाले सफाई झाली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मात्र पावसापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेने म्हटले आहे. नालेसफाई, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, पाणी उपसण्याचे पंप यावर हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करूनही या वर्षीही शहरात सकल भागात पाणी तुंबण्याची भीती आहे. मेट्रोच्या कामातून निर्माण झालेला डेब्रिज नाल्यावर पडल्याने वांद्रे येथे आलेली पूरस्थिती पाहता महानगरपालिकेने या वेळी शहरातील 17 ठिकाणांची जबाबदारी मेट्रो कॉर्पोरेशनकडे सोपवली आहे. उर्वरित 208 सखल जागांवर पाणी जास्त काळ तुंबून राहू नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. सखल भागातील पाणी उपसून काढण्यासाठी ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाअंतर्गत गेल्या आठ वर्षांत सहा जल उदंचन केंद्रे बांधण्यात आली असून त्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येकी दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र तरीही शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता पालिकेला वाटत आहे. या वेळी शहरातील 225 ठिकाणी पाणी तुंबणार असल्याचे पालिकेच्या पाहणीत दिसून आले असून त्यातील 60 ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या अधिक असणार आहेत. यात दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, भायखळा, दादर, माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला, अंधेरी, मालाड, घाटकोपर या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी पालिकेचे अधिकारी जास्त लक्ष देणार आहेत. तसेच पाणी उपसण्यासाठी पंपही पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
17 जागांची जबाबदारी मेट्रोवर -
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांच्या राडारोडय़ामुळेही गेल्या वर्षी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. हा अनुभव लक्षात घेता महानगरपालिकेने या वर्षी शहरातील 17 ठिकाणांची जबाबदारी मेट्रोवर सोपवली आहे. यात मुख्यत्वे पश्चिम उपनगरात काम सुरू असलेल्या भूमिगत मेट्रोच्या स्थानकांचा समावेश आहे. त्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यजलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या अन्यत्र हलवताना पाण्याचा प्रवाह अडला जाणार नाही, याची काळजी संबंधित संस्थांनी घेणे आवश्यक आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार या 17 जागांची जबाबदारी मेट्रो प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
नालेसफाई -
नालेसफाई -
नालेसफाईसाठी महापालिकेने 154 कोटी रुपयांची कंत्राटे दिली आहेत. संपूर्ण शहरात 260 किलोमीटर लांबीचे मोठे नाले असून 465 किलोमीटरचे लहान नाले आहेत. पावसाळ्याआधी या नाल्यांमध्ये साडेपाच लाख टन गाळ काढला जाणार आहे. तर सखल भागातील पाणी उपसून गटारात टाकण्यासाठी या वेळी 279 संच भाडेतत्त्वावर लावण्यात येणार आहेत. पाणी जास्त तुंबण्याच्या ठिकाणी अधिक संच लावले जातील. हे संच 25 मे ते 15 ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. या कंत्राटासाठी पालिकेने 55 कोटी रुपये खर्च केले आहेत.
No comments:
Post a Comment