10 ते 500 रुपये शुल्कवाढीचा प्रस्ताव -
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामधील सोनोग्राफी व बधिरीकरणाचे शुल्क नुकतेच वाढले आहेत. त्यानंतर आता पालिकेच्या एकमेव असलेल्या दंत रुग्णालयातील उपचार शुल्कात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शुल्क वाढीचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केल्यास दात काढणे व अन्य उपचारखर्च 10 रुपये ते 500 रुपयांनी महागणार आहे.
नायर हॉस्पिटल व दंत महाविद्यालय हे मुंबई महापालिकेचे एकमेव दंत हॉस्पिटल आहे. गेल्या 82 वर्षापासून या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रूग्णांच्या आर्थिक परिस्थितीनुसार विभाग प्रमुख उपचाराच्या खर्चात 25 टक्के ते 100 टक्केपर्यंत सवलत देतात. पालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत तर, ज्येष्ठ नागरिकांना तपासणी व शस्त्रक्रियेसाठी 50 टक्के सवलत देण्यात येते. या रुग्णालयाच्या दंत उपचाराच्या शुल्कात मागील तीन वर्षापासून कोणत्याही शुल्कात वाढ करण्यात नव्हती. त्यानंतर वाढलेले बाजारभाव, अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या वाढलेल्या किमती विचारात घेऊन, येथील उपचारशुल्कात 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. अल्पदराने वसूल करण्यात येणा-या शुल्कात 10 क्के वाढ करणे अपरिहार्य ठरत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान स्थायी समितीत व महासभेत या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान विरोधी पक्षांनी याआधीही रुग्णालायत आधी सुविधा द्या नंतर शुल्कवाढ करा अशी मागणी करत शुल्कवाढीला विरोध केला होता. मात्र विरोधकांकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी शिवसेनेने शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावेळीही विरोधकांच्या विरोधाला न जुमानता शिवसेना मुंबईकरांवर शुल्कवाढ लादणार का याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
अशी होणार शुल्कवाढ --
उपचार सद्याचे दर वाढीव दर
1) सर्जीकल एक्स्ट्रॅक्शन 50 70
(एका दातामागे)
2) मायनर सर्जरी 125 140
3) मेजर सर्जरी 250 280
4) संवेदना हरणाने दात काढणे 20 30
5) म्युको जींजीव्हल सर्जरी 90 100
6) स्टेनलेसस्टील क्राऊन 100 110
7) वरची आणि खालची कवळी 275 310
8) रिलायनिंग ऑफ डेंचर 65 80
9) दंत व्यंगोपचार संपूर्ण उपचार 5000 5500
10) एक्स्ट्रा ओरल एक्सरे फिल्म 125 140
11) कास्ट पार्शिअल डेंचर फ्रेम वर्क 1200 1320
12) सायलोग्राफी 125 140
13) स्पेशल डेंचर 85 100
14) ऑर्थोडोंटीक ट्रिटमेंट 2500 2750
15) ऑल सिरॅमिक क्राऊन 1000 1100
16) फ्लॅप सर्जरी 75 90
No comments:
Post a Comment