मुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात काम करणारे कर्मचारी हजेरी लावल्यावर कामाच्या ठिकाणाहून गायब असतात. कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास युनियन आणून दादागिरी केली जाते. यामुळे या कर्मचाऱ्यांवर रुग्णालय प्रशासनाचा अंकुश राहिला नसल्याचा आरोप नगरसेविका सईदा खान यांनी केला आहे. यावर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून रुग्णालयातील ३७३ रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिका रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहात काम करणारे वार्ड बॉय, आया इत्यादी चतुर्थश्रेणी कामगार कामावर आल्यावर हजेरी लावतात. त्यानंतर मात्र आपल्याला नेमून दिलेल्या जागेवरून गायब असतात. पुन्हा कामावरून घरी जाताना हे कर्मचारी पुन्हा आपल्या हजेरीच्या जागी येतात. पालिकेने बायोमेट्रिक हजेरी सुरु केली असली तरीही असे प्रकार सुरु आहेत. कर्मचारी आणि समयपाल (टाइम किपर) यांचे साठेलोटे असते. कर्मचाऱ्यांची तक्रार केल्यावर ते युनियनकडे जातात. वरिष्ठ अधिकारी डॉक्टर यांना दादागिरी करतात. कामावर असताना नशा करतात. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई अशी मागणी खान यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली होती.
खान यांच्या हरकतीच्या मुद्दयावर स्पष्टीकरण देताना, कामावर नसताना हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल देण्याच्या सूचना परिसेवीका व विभाग प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. तक्रार आल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिव रुग्णालयात १७२५ पैकी ३७३ पदे रिक्त आहेत. समयलेखक, सहाय्यक समयलेखक, हविलदार यांची १२ पैकी १० पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात आहे. रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरु आहे. कामावर नशेत असलेल्या तसेच गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचा अभिप्राय रुग्णालयाच्या डीन डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिला आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायावर खान यांनी नाराजी व्यक्त केली असून मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.