स्वच्छ भारत अभियानाची नुसती बॅनरबाजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वच्छ भारत अभियानाची नुसती बॅनरबाजी

Share This
मुंबई - मुंबईत मलनिःस्सारण वाहिन्या नसताना घराघरात शौचालय उभारणे शक्य नसल्याने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असून योजनेची नुसती बॅनरबाजी सुरु असल्याचा आरोप शिवसनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी हा आरोप स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केला आहे. 

मुंबईत झोपडपट्टी परिसरात मलनिःस्सारण वाहिन्या नाहीत.अंधेरी गणेश नगरमध्ये ४० लाख रुपये खर्च करून मलनिःस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या. या वाहिन्या लिंक रोडला जोडण्यासाठी २०१५ पासून प्रयत्न केला जात आहे. यासाठी काढण्यात येणारे टेंडर जास्त रक्कमेचे असल्याने अद्याप या वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडण्यात आलेल्या नाहीत. वी. रा. देसाई तसेच मुंबईत अशीच परिस्थीती आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियान कागदावरच राहिले असल्याची टिका पटेल यांनी केली. यावर बोलताना मंगेश सातमकर यांनी सायन कोळीवाडा येथे २९ इमारतींच्या वसाहतीत एसटीपी बांधल्या मात्र त्या मलनिःस्सारण वाहिन्यांना जोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या मलनिःस्सारण वाहिन्यांमधील मल नाल्यात सोडण्यात येत असल्याची माहिती दिली. मलनिःस्सारण वाहिन्या का टाकल्या जात नाहीत, त्यासाठी तरतूद का केली जात नाही असे प्रश्न उपस्थित करत स्वच्छ भारत अभियान नावापुरते असल्याची टिका सातमकर यांनी केली. सदानंद परब यांनी पालिकेकडे मॅनहोल व मलनिःस्सारण वाहिन्या शोधण्यासाठी जुने यंत्र असल्याने गेल्या दिड महिन्यात ६० फूट मलनिःस्सारण वाहिनी टाकता आली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. यावर मलनिःस्सारण वाहिन्या नसल्याची समस्या सर्व नगरसेवकांना भेडसावत आहे. या वाहिन्या टाकता याव्यात म्हणून एमएसडीपी द्वारे विभाग स्तरावर सर्व नगरसेवकांना सादरीकरण करावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. तोपर्यंत पटेल यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages