नाशिक / येवला :- नाशिक येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील कर्करोग व किडनी प्रत्यारोपन विभागासह येवला येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झालेल्या रुग्णालय तसेच निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील आकृतीबंधासह येवला ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी छगन भुजबळ हे सातत्याने पाठपुरावा करत होते.
येवला रुग्णालयाचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या ८ कोटी ५० लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून दि.१४ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हे बांधकाम सुरु व्हावे यासाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरूच होता. या इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून आता येथील पदांचा आकृतीबंध सुद्धा मंजूर झाल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.
येवला शहर व तालुक्याचा विस्तार बघता शहर व तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा येवला शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आग्रही होते. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून येवला शहरात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची सुंदर इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येवला ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास पाठपुरावा केला होता. तसेच खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुद्धा त्यांचा पाठपुरावा सुरु होता.