राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार -
मुंबई - मुंबई महापालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जात असला तरी नालेसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार सुरु असून मुंबईकर नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. तर नालेसफाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी दिला आहे.
पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरु असलेल्या नालेसफाईची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. या पाहणीनंतर अहिर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव व पालिकेच्या अधिकाऱ्यांसह धारावी मधील कमाल नगर, 60 फूट रस्त्या व इतर नाल्यांची पाहणी केली. अनेक नाले कचऱ्याने भरलेले निदर्शनास आले. काही ठिकाणी पाहणी होणार म्हणून जेसीबी लावून नालेसफाई सुरु करण्यात आल्याचे अहिर यांनी सांगितले. डेडलाईन दहा दिवसावर आली असल्याने नालेसफाई कशी होणार, नालेसफाई होत असताना वॉच डॉगच्या भूमिकेत असणारे आता कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महापौरांनी मुंबई तुंबल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असे विधान केले होते. महापौरांचे हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे मत अहिर यांनी व्यक्त केले. सत्येत सहभागी असणाऱ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवून चालणार नाही. जनता सुज्ञ आहे अशी प्रतिक्रिया अहिर यांनी यावेळी दिली.
याबाबत पालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या कि जानेवारी महिन्याच्या दरम्यान नालेसफाईच्या निविदा निघाल्या असताना अजूनही नालेसफाई पूर्ण झालेली नाही. पावसाळा तोंडावर आला असला तरी नालेसफाई पूर्ण होईल यांची शक्यता नाही. नालेसफाईची अवस्था आम्ही आयुक्तांना कळवणार असून नालेसफाई पूर्ण झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. मी स्वतः या नालेसफाईबाबत पालिकेकडे लाईव्ह मॉनिटरिंगची मागणी केली आहे, हा मुद्दा लावून धरणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी मुंबई दक्षिण मध्य जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश परब, गोविंदभाई परमार, तालुकाध्यक्ष अफसर खान, माजी नगरसेवक वकील शेख व नगरसेविका रेश्मा बानो मोहम्मद हाशिम खान उपस्थित होते.
No comments:
Post a Comment