Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात सहा दिवस मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता


मुंबई - भारतीय हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उद्या,दि. ७ जून २०१८ ते सोमवार, दि.११ जून २०१८ या कालावधीत राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यानुषंगाने प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या, दि. ७ जून २०१८ रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दि. शुक्रवार, ८ जून२०१८ रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची व अतिवृष्टीची शक्यता असून रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

शनिवार, दि. ९ जून २०१८ रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची व अतिवृष्टीची शक्यता आहे. तर दि.१० व ११ जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई व नजीकच्या परिसरासह बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा अंदाज आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने राज्यातील बहुतेक ठिकाणी विशेषतः कोकण परिसरात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिले आहेत.

मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका / नगरपालिका, तहसिलदार येथील सर्व नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याचे, सर्व जिल्हास्तरीय व निम्नस्तरीय अधिकारी यांना आपापल्या मुख्यालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणे, सर्व जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सर्व जिल्हास्तरीत यंत्रणा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कार्यवाहीसाठी दक्ष आहेत याबाबत खात्री करण्याच्या सूचना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्व जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

प्रशासनास सज्ज राहण्याचे निर्देश -
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन राज्यातील विशेषतः कोकण भागातील जिल्हा प्रशासनास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवून अशा परिस्थितीत योग्य ती दक्षता घेण्याच्या व नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस व अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

नागरिकांनो, मुसळधार पावसात अशी घ्या काळजी -
1) आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा
2) पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या
3) अति मुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रवास टाळा
4) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वे व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती घ्या
5) वीज चमकताना झाडाखाली उभे राहू नका. मोबाईलवर संभाषण करु नका, इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहा
6) आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा
7) मुंबईत असल्यास महानगरपालिकेच्या 1916 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा
8) हवामानाची अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन मिळवा
9) अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून खात्री करा

प्रशासनास सूचना -
1) राज्यातील मंत्रालय, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महानगरपालिका / नगरपालिका, तहसिलदार येथील नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवावेत.
2) मुख्यालयातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे सर्व जिल्हास्तरीय व निम्नस्तरीय अधिकारी यांना सूचना.
3) सर्व जिल्हास्तरीत यंत्रणा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कार्यवाहीसाठी दक्ष आहेत याबाबत खात्री करावी.
4) आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती प्रसारित करावी.
5) ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर राहतील तसेच संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी.
6) शहरी विभागात सर्व महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचे सर्व कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पूर्णवेळ उपलब्ध असतील व झाडे पडणे, इमारती पडणे, पूर येणे, दरडी कोसळणे इ. परिस्थितीत शोध व बचाव कार्य तातडीने करतील याचे योग्य नियोजन करावे.
7) नागरिकांना अतिवृष्टीच्या कालावधीत पूर्व सूचना देऊन जागरुक ठेवावे व आवश्यक त्या प्रमाणे त्यांचे तात्पुरते स्थलांतर करावे.
8) पूरप्रवण क्षेत्र आणि पाणी तुंबण्याच्या ठिकाणांवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात यावे.
9) अतिवृष्टीमुळे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.
10) अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे, आरोग्य अधिकारी, जेसीबी मशीन इ. बाबी सज्ज ठेवण्यात याव्यात.
11) एस.टी., रेल्वे, सार्वजनिक तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात यावे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom