मुंबई - मुंबईतील एका शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. कर्जाला कंटाळून झुरळ मारण्याचे औषध पिऊन भिंगारे कुटुंबियाने आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे वांद्रे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वांद्रे पूर्व शासकीय वसाहत बिल्डींग नंबर २ मधील रूम नंबर २०१ येथे राजेश तुळशीराम भिंगारे (वय ४५) आपल्या कुटूंबासह राहत होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी अश्विनी (४०), मुलगा तुषार (२०), दुसरा मुलगा गौरांग (१७) यांच्या सोबत राहात होते. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास भिंगारे यांनी आपल्या पत्नी मुलासह झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भिंगारे हे रेशनिंग कार्यालयात कार्यरत होते. तुषार हा हॉटेल मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. तर गौरांग हा रुपारेल कॉलेजमध्ये बारावीला शिकत होता. कर्जाला कंटाळून भिंगारे यांनी आत्महत्या केल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीतून समोर आले आहे. या घटनेची अधिक चौकशी खेरवाडी पोलीस ठाण्याकडून केली जात आहे.