मुंबई - उघड्या मॅनहोलमध्ये पडून सुप्रसिद्ध डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. याप्रकारावरून पालिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यानंतरही पालिकेने योग्य सुधारणा न केल्याने कुर्ला येथे उघड्या गटारात पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव दिनेश प्रकाश जटोलिया असून तो २४ वर्षाचा आहे. महापालिकेवर ३०२ कमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर सायनकडून चेंबूरकडे जाताना कुर्ला सिग्नल जवळ सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मध्यभागी बंदिस्त गटाराचे काम सुरु आहे. गटार तीन आठवड्यापूर्वी बंदिस्त करण्यात आले असले तरी गटारावर काही ठिकाणी झाकणे बसवण्यात आलेली नव्हती. शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता दोन व्यक्ती कुर्ला सिग्नलकडून चेंबूरच्या दिशेने या गटारावरून चालले होते. इतक्यात अचानक आवाज आला. मागील व्यक्तीला आपला पुढील व्यक्ती गटारात पडल्याचे समजताच त्याने आरडाओरडा सुरु केला. त्याचा आरडाओरडा ऐकून या जवळ असलेल्या प्रगती या इमारतींमधून नागरिक धावून आले. एकाने अग्निशमन दलाला तर एकाने पोलिसांना फोन लावला. तो पर्यंत काही जणांनी बांबू आणि शिडी घेऊन त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गटार १५ ते २० फूट खोल असल्याने त्याला बाहेर काढता आलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात पाठवले अशी माहिती या विभागातील रहिवाशी असलेले भीमा सोनावणे यांनी दिली.
डॉ. अमरापूरकर यासारखे सुप्रसीध्द डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतरही पालिकेने कोणतीही काळजी घेतलेली नाही. कंत्राटदाराने गटाराचे काम झाल्यावर त्यावर झाकण लावलले नव्हते. उघड्या गटारात पडून कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून उघड्या गटारांवर झाकण व जाळी बसवायला हवी. एखादा व्यक्ती मॅनहोल किंवा गटारात पडल्यास त्याला पकडण्यासाठी आतमध्ये कोणतीही सुविधा नाही. गटाराच्या आत एखादा व्यक्ती पडल्यास त्याला पकडण्यासाठी काहीतरी सुविधा असली पाहिजे. त्यामुळे एखाद्याचा जीव वाचवता येऊ शकतो असे भीमराव घोडके यांनी सांगितले. गटारातून बाहेर काढले तेव्हा तो व्यक्ती मृत झाला होता अशी माहिती घोडके यांनी दिली. युवकाच्या मृत्यूला सर्वस्वी पालिका जबाबदार असल्याने संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी घोडके यांनी केली. मृत दिनेशबाबत अधिक विचारपूस केली असता तो मूळ राजस्थान नागोरी येथील रहिवाशी आहे. मुंबईत तो ठक्कर बाबा कॉलनीमधील एका चप्पलच्या कारखान्यात काम करत होता. या दुर्घटनेबाबत कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्यात ३०४ अ या कलमान्वये पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा (२४७/२०१८) नोंदवण्यात आला आहे.