मुंबई - राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ज्युनिअर कॉलेजमधून सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवण्याचा आदेश काढला आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागांतील सर्व ज्युनिअर कॉलेजमधील सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य होणार आहे.
राज्यातील ज्युनिअर कॉलेजमधील सायन्स शाखेत शिकणारे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रॅक्टिकलला उपस्थित राहतात. नियमित वर्गांऐवजी कोचिंग क्लासेसला जातात. अनेक ज्युनिअर कॉलेजेसनी यासाठी खासगी कोचिंग क्लासेससोबत करार केले आहेत. हे विद्यार्थी क्लासेसना उपस्थित राहतात. नियमित वर्गांना उपस्थित राहत नाहीत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आमदारांनी विधिमंडळातही हा विषय अनेकदा उपस्थित केला होता. यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजेसना बायोमेट्रिक हजेरीसाठीची साधनसामग्री एका महिन्याच्या आत स्वत:च लावून घ्यावी लागणार आहे. जी कॉलेजेस बायोमेट्रिक संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. शिक्षणाधिकारी हे कॉलेजना भेट देऊन पाहणी करणार आहेत. हे आदेश तत्काळ अंमलात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.