मुंबई - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही अशी तक्रार दरवर्षी केली जायची. मात्र गेल्या दोन वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. या वर्षीही शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य व नववीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या 1195 शाळा आहेत. या शाळांत शिकणा-या मुलांना पालिका गणवेशासह 27 शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. त्यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली जाते. मागील वर्षी साहित्य वस्तूसाठी 120 कोटी तर गणवेशासाठी 31 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला होता. या शाळांत शिकणारी बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणा-या पालकांची असतात. या मुलांना पालिकेकडून आवश्यक शैक्षणिक साहित्य दिले जाते. मात्र यापूर्वी गणवेश व साहित्यासाठी मुलांना वर्षभऱ प्रतीक्षा करावी लागे. शिक्षण विभागाची ही प्रथा अनेक वर्षापासून सुरू होती. यावरून पालिकेच्या स्थायी समिती, महासभेत अनेकेवळा वादही झाले. वाद शिगेला पोहचल्यानंतर प्रशासनाने मागील दोन वर्षापासून पहिल्याच दिवशी गणवेश व शालेय साहित्य शाळेच्या पहिल्याच दिवशी दिले जाते असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. यंदाही वेऴेत साहित्य मिऴेल अशी तयारी पालिकेने केली होती. पालिका शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी याबाबत विशेष लक्ष घालून वेळेत वस्तू मिळतील यासाठी प्रयत्न केला. शुक्रवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, उपआयुक्त मिलीन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.