File Photo
मुंबई - मुंबई महापालिकेने नालेसफाई चांगली झाल्याचा दावा केला असताना शनिवारी रात्री मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडला. मुंबई उपनगरात पडलेला हा पाऊस 50 मिमीपेक्षा कमी पडला. तरीही महापालिकेला पूर्व उपनगरातील भांडुप येथे तब्बल 50 मिनिटे पंप चालवून पाण्याचा निचरा करावा लागला आहे. यामुळे पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह मुंबईत मान्सूनपूर्व रिमझिम पाऊस पडला. पावसाच्या मोजणीसाठी मुंबईत काही ठिकाणी पाऊस मोजण्यासाठी पालिकेने केंद्र निर्माण केली आहेत. या केंद्रांपैकी वडाळा येथे 8 मिलीमीटर, धारावी येथे 5 मिलीमीटर, कुर्ला येथे 34 मिलीमीटर, चेंबूर येथे 22 मिलीमीटर, मालाड चिंचोली येथे 39 मिलीमीटर, कांदिवली येथे 34 मिलीमीटर, गोरेगाव येथे 23 मिलीमीटर, दिंडोशी येथे 26 मिलीमीटर, बोरिवली येथे 25 मिलीमीटर, दहिसर नाका येथे 20 मिलीमीटर, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 23 मिलीमीटर तर अंधेरी येथे 22 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वीच पर्जन्य जलवाहिन्यांचे नविनीकरण केले आहे. शहरात याआधी पर्जन्य जलवाहिन्यांची 25 मिलीमीटर पाऊस पडल्यास पाणी वाहून नेण्याची क्षमता होती. त्यात 50 मिलीमीटर पर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतरही मुंबई उपनगरात 50 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला तरी या पावसात गोरेगाव भगतसिंग नगर, न्यू लिंक रोड, गोरेगांव पश्चिम, कांदिवलीतील आनंदनगर जंक्शन, मालाड येथील न्यू कलेक्टर कॉलनी गेट नंबर 2, मालाड येथील मालवणी गेट नंबर 7 तसेच चेंबूर आचार्य रोड आदी भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले. उपनगरात काही भागात पाणी साचले असले तरी कोठेही पंप लावण्याची गरज भासली नसल्याची माहीत पालिकेकडून देण्यात आली आहे, मात्र पूर्व उपनगरातील भांडुप पाटील वाडी येथे रात्री 9 ते 9.50 वाजेपर्यंत तब्बल 50 मिनिटे पंप चालवून पालिकेला पाण्याचा निचरा करावा लागला आहे. याबाबत पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाशी संपर्क साधला असता होऊ शकलेला नाही.
नालेसफाई योग्य प्रकारे होत नाही -
नालेसफाई वर्षभर होणे अपेक्षित आहे. मात्र फक्त पावसाळयाच्या तोंडावर केली जाते. यामुळे नालेसफाई योग्य प्रकारे होत नाही. नालेसफाई झाली नसल्याने पाणी साचण्याचे प्रकार होतात. त्यामधूनही नागरिकांनी आपली सुरक्षा स्वतःच करावी असे प्रशासनाकडून सुचवले जाते. नालेसफाई चांगली झाल्याने व अनेक ठिकाणी पम्पिंग स्टेशन बांधल्याने पालिकेने पंप लावू नये अशी मागणी नगरसेवकांनी केली. ही चर्चा बंद करण्यासाठी काही ठिकाणचे पंप बंद केल्याचे सांगण्यात येत असले तरी परिस्थिती वेगळी आहे. पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन देताना नगरसेवकांचा अवमान करू नये.
- राखी जाधव, गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस
- राखी जाधव, गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस