मुंबई - महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या प्लॅस्टिक बंदी कायद्यातील तरतुदीनुसार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिकविरुद्ध उद्यापासून प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लॅस्टिकला पर्याय असणाऱया वस्तू व प्लॅस्टिक पुनर्चक्रिकरण याबाबत नॅशनल स्पोर्ट् स क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केले.
महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिक व थर्माकोलबाबत देशातील विविध राज्यात जाऊन तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. प्रशासकीय व पोलिस अधिकारी यांनी सदर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे सांगून कदम पुढे म्हणाले की, प्लॅस्टिक व थर्माकोलमुळे पावसाळ्यात पाणी साचणे, जनावऱयांच्या पोटात प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडणे तसेच यामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱहास या बाबींचा विचार केला असल्याने नागरिकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीस सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. कदम यांनी केले. तसेच महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांनी याकामी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख करुन त्यांनी पालिका व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे कौतुक केले.
याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचे दुष्परिणाम विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नाले तुंबण्याचे प्रकार प्रकर्षाने जाणवतो, प्लॅस्टिक बंदीमुळे अशाप्रकारच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळणार असून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना शिवसेना नेते व युवा प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, प्लॅस्टिक व थर्माकोलचे झालेले दुष्परिणाम आपण सर्व मुंबईकरांनी अनुभवले असून विशेषतः पावसाळ्यात पंपिंग स्टेशनच्या पातमुखावर प्लॅस्टिक व थर्माकोल अडकल्याने आजुबाजूच्या परिसरात पाणी साठल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण झाल्या. प्लॅस्टिक बंदी करणारे महाराष्ट्र राज्य हे १८ वे राज्य असून महापालिका, राज्य शासन यांच्याशी वारंवार केलेल्या चर्चेनुसार मुंबईकरांच्या भवितव्यासाठी सदर कायदा बनविण्यात आला असून या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुंबईकरांचा भविष्यकाळ उज्ज्वल होण्यास हातभार लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलाताना महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, दररोज ९ हजार मेट्रिक टन कचरा गोळा करुन त्याची क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत होती. महापालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ती ७ हजार मेट्रिक टनापर्यंत आणली आहे, आणखीन तो ६ हजार मेट्रिक टनापर्यंत आणण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील ४० शहरांमधून २० टक्के कचरा हा प्लॅस्टिकचा असतो तर, एकट्या मुंबईतून ७०० मेट्रिक टन प्लॅस्टिकचा कचरा निर्माण होतो व त्याची पालिका विल्हेवाट लावते.
पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन जागतिक स्तरावर विविध उपाययोजना व परिसंवाद आयोजित करण्यात येत असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या समतोलासाठी प्रबोधन होत असून आपल्या पाल्यांना विरासत म्हणून पैसे अथवा मालमत्ता देण्याबरोबरच चांगले पर्यावरण दिले तर, त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. तसेच चांगल्या पर्यावरणामुळे आरोग्याचे प्रश्नही सोडविण्यास मदत होईल, असे श्रीमती काजोल देवगण यांनी शेवटी सांगितले.
- काजोल, सुप्रसिद्ध अभिनेत्री
प्लॅस्टिक व थर्माकोलमुळे होणारा दुष्परिणामाबाबतची माहिती सांगून राज्य शासन, बृहन्मुंबई महापालिका यांनी उशिरा का होईना चांगल्याप्रकारचा कायदा करुन येणाऱया पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यास हातभार लावला आहे. अशाप्रकारच्या प्रदर्शनामुळे प्लॅस्टिक बंदीबाबत तसेच प्लॅस्टिकला पर्याय म्हणून उपलब्ध असणाऱया विविध वस्तुंमुळे पर्यावरणाच्या ऱहासापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल.
- अजय देवगण, सुप्रसिद्ध अभिनेते