मुंबई - पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचले. रेल्वे रुळही पाण्याखाली गेले होते. मात्र, कचरा न उचलण्याची जबाबदारी पार न पाडल्याने पाणी साचले, असा आरोप रेल्वेने महापालिकेवर केला आहे.
पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून मुंबईची लाईफ लाइन को़लमडल्याचे प्रकार दरवर्षी घडतात. मात्र यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून रेल्वे आणि पालिकेच्या वतीने पावसाळ्याआधीच रेल्वेच्या मार्गावरील कल्व्हर्ट आणि नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली होती. ही कामे पूर्ण झाल्याचा दावा रेल्वेने केला होता. तरी ही मुंबईत पडलेल्याच पहिल्या पावसाने मध्य रेल्वेचा सफाईचा दावा फोल ठरवला. याबाबत मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थाप डी. के. शर्मा यांना पत्रकारांनी छेडले असता, रेल्वे रुळावरचा कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची अाहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे सांगत शर्मा यांनी महापालिकेला लक्ष्य केले. त्यांनी आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली तर बऱ्यापैकी समस्या सुटतील, असा अप्रत्यक्ष टोला शर्मा यांनी महापालिकेला लगावला आहे. महापालिकेने मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.