मुंबई - मुंबई महापालिकेने घाटकोपर येथील तानसा पाईप लाईनवरील झोपड्या मागीलवर्षी तोडल्या. मात्र वर्षभरात डेब्रिज उचलले गेले नसल्याने डोंगावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर डेब्रिज घरांवर कोसळून जीवित हानी होण्याची भीती रामनगर येथील अशोक बैरागी यांनी व्यक्त केली आहे.
एक वर्षापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार घाटकोपर पश्चिम वॉर्ड क्रमांक १२३ व १२७ येथील तानसा पाईपलाईनवरील ४३२ झोपड्या मुंबई महानगरपालिकेने तोडल्या. तोडलेल्या झोपड्यांचे डेब्रिज त्वरित उचलावे अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात आली होती. तत्कालीन प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश उर्फ तुकाराम पाटील आणि एन विभागाच्या सहाय्य्क आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी या ठिकाणी भेट देत रॅबिट उचलण्याचे आदेश दिले होते. मात्र डेब्रिज उचलले नसल्याने डोंगरावरून खाली येऊन संरक्षण भिंत तोडून आठ घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी दुसऱ्यांदा अपघात होऊन अलोक सहानी हा अडीच वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. पालिकेने डेब्रिज उचलले नसल्याने यावर्षी पुन्हा पावसाळ्यादरम्यान डोंगरावरून येणाऱ्या पाण्याबरोबर डेब्रिज घरांवर पडून दुर्घटना घडण्याची भीती असल्याची माहिती बैरागी यांनी दिली. मागील वर्षी दुर्घटना होऊन एक मुलगा जहाकामी झाला होता तशीच दुर्घटना पुन्हा घडण्याआधी पालिकेने येथील डेब्रिज उचलावे व सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी बैरागी यांनी केली आहे. दोन नगरसेवकांच्या हद्दीमधील वादामुळे या विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे.
एन विभागाच्या सहाय्यक आयुक्ताना त्याठिकाणी आणून डेब्रिज उचलण्यासाठी सांगण्यात येईल. तसेच सुरक्षा भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल.
- स्नेहल मोरे, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक १२३