मुंबई - मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात नर्सिंग कोर्ससाठी सोमवार पासून अर्ज देण्यास सुरुवात झाली. मात्र अर्ज वाटपासाठी फक्त एकच काऊंटर सुरू केल्यामुळे हजारो पालक आणि सुमारे दीड हजार मुलींमध्ये प्रचंड गोंधळ झाला. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी संपर्क साधून सायंकाळची ४ ची वेळ वाढवून ६ वाजेपर्यंत केली आणि उमेदवारांना दिलासा दिला.
केईएममधील नर्सिंगच्या कोर्ससाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज देण्यास सकाळी ९ वाजता सुरू झाली. मुंबई, रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सुमारे दीड हजार मुली आणि पालक रांगेत उभे होते; पण प्रशासनाने फक्त एक काऊंटर सुरू केल्यामुळे प्रचंड गोंधळ सुरू होता. स्थानिक उपशाखाप्रमुख प्रदीप मोगरे यांनी नगरसेवक कोकिळ यांना ही माहिती दिल्यावर त्यांनी डॉ. सुपे यांच्याशी संपर्क साधला आणि सायंकाळची ४ ची वेळ ६ पर्यंत वाढवून देण्याबद्दल सूचना दिल्या आणि रांगेतील विद्यार्थ्यांना दिलासा दिला. स्थानिक आमदारांनीही तेथे भेट देऊन प्रशासनाशी चर्चा केली. या वेळी शाखाप्रमुख किरण तावडे, उपशाखाप्रमुख किरण करपे आदी उपस्थित होते.