नवी दिल्ली - रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी किती सामान न्यावे याबाबत नियम असले तरी प्रवासी आपल्यासोबत प्रमाणाच्या बाहेर सामान सोबत नेतात. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून वारेमाप सामान नेले जात असल्याने या प्रकाराला छाप लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे आपल्यासोबत वारेमाप सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल ६ पट दंड ठोठावला जाणार आहे.
रेल्वेच्या नियमानुसार शयनयान श्रेणीतील प्रवाशांना आपल्यासोबत कमाल ४० किलो वजनाचे तर दुसऱ्या दर्जाचे तिकीट असलेल्या प्रवाशांना ३५ किलो वजनाचे सामान नि:शुल्क नेण्यास परवानगी आहे. या मर्यादेच्या बाहेर शुल्क भरून शयनयान श्रेणीतील प्रवासी ८० किलो तर दुसऱ्या दर्जाचे प्रवासी ७० किलोपर्यंत सामान नेऊ शकतात. बऱ्याचदा प्रवासी या वजनमर्यादेचे पालन करत नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्या आहेत. मात्र, त्यावर गांभीर्याने विचार झाला नव्हता. आता मात्र प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून अतिरिक्त सामान आढळल्यास त्यावरील शुल्काच्या सहा पट दंड आकारण्यात येणार आहे.