Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज


नागपूर, दि. 10 : राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 9 जुलै या कालावधीत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आज अखेरपर्यंत 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 189 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 जुलै 2018 अखेर राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष व सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

पाटील यावेळी म्हणाले, आज मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यात 66 ठिकाणी पाणी साचले होते. अशा ठिकाणी 152 पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आलेला आहे. 15 बस मार्ग बदलून इतरत्र वळविण्यात आले. वसई येथे राजावली, तिवरी, सातीवली व मिठागर परिसरात पाणी साठल्याने अंदाजे 300 लोकांना पाण्याचा वेढा पडला होता. तेथील नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्याप्रमाणे विरार व नालासोपारा येथे बडोदा एक्सप्रेस व शताब्दी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रूळावर पाणी साचल्याने उभ्या आहेत. या रेल्वेतील प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक प्रशासनामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे 700 प्रवाशांना रेल्वेमधून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांची स्थानिक वाहतूक करण्याची वसई-विरार महानगरपालिका, राज्य परिवहन मंडळ व खासगी बसेसमार्फत सोय करण्यात आली आहे. वसई येथे मिठागर परिसर व रेल्वेतील अडकलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक प्रशासनामार्फत खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.

राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, अहमदनगर, सातारा, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम,यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलै या कालावधीत त्या त्या जिल्ह्यातील सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित नाशिक (64.5 टक्केस) धुळे (95.1 टक्कें), नंदूरबार (66.6 टक्केव), जळगाव (78.6 टक्के5) पुणे, कोल्हापूर (70.9 टक्केि),औरंगाबाद (69.2 टक्केु), जालना (78.1 टक्के) बीड (86.5 टक्केव),उस्मानाबाद (98.4 टक्केर) (78.1 टक्के ), बुलढाणा (62.5 टक्केव), गोंदीया (91.3 टक्केक), सोलापूर(61.3 टक्केण) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्याचा आज अखेर पाऊस 390.4 मि.मि. एवढी नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण तालुक्यांपैकी 189 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 92 तालुक्यात 75-100 टक्के, 59 तालुक्यात 50-75 टक्के व 13 तालुक्यात 25-50 टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या 25 ते 50 टक्के0 पाउस पडलेले 13 तालुके बुलढाणा (जळगाव-जामोद, संग्रामपूर, नांदुरा, देउळगावराजा,सिंदखेडराजा), जळगाव (जळगाव), जालना (जाफराबाद) औरंगाबाद (खुलताबाद), सांगली (तासगाव), सोलापूर (दक्षिण सोलापूर, पंढरपूर, सांगोला,करमाळा) या जिल्ह्यातील आहेत.

राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 62 व्यक्तींचा बुडून, वीज पडून इत्यादींमुळे मृत्यू झाला असून 63 जनावरे दगावली आहेत. उत्तर व दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना विविध माध्यमातून पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले व वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्याची दक्षता घेण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागपूर, पालघर, मुंबई व पुणे येथे अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी “राष्ट्रीय आपत्ती व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा” वापर करण्यात आला. वसई येथील चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना सोडविण्यासाठी वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे बाधित व्यक्तींना नियमानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.

आज मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा, पालघर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत मुंबई शहर येथे 74.23 मि.मि. व मुंबई उपनगर जिल्ह्यात 47.53 मि.मि. पाउस झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई व पालघर येथे दुपारी चार वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत अनुक्रमे 248.7 मि.मि. व पालघर येथे 199.2 मि.मि. इतका पाऊस पडला असून सध्याही पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. उद्या दि. 11 जुलैरोजी ठाणे व पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाची माहिती सोबत जोडली आहे.

पावसामुळे उद्भवणा-या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष व सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom