मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल लवकर देण्याची राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल लवकर देण्याची राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती

Share This
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचे कामकाज अधिक शीघ्र गतीने करून त्यासंबंधीचा अहवाल राज्य शासनास लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड व सदस्य सुवर्णा रावल यांची भेट घेतली व त्यासंबंधीचे निवेदन दिले.

माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या भेटीनंतर पाटील म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयात आरक्षणासंबंधीची पुढील कार्यवाही करण्यासाठी मराठा समाज हा मागास असल्याचा राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक आहे. त्यामुळे आयोगाने हा अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती राज्य शासनाच्या वतीने आयोगाकडे केली आहे. तसेच यावेळी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्याकडून कामकाज कसे सुरू आहे याची माहिती जाणून घेतली आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया 31जुलैपर्यंत संपणार आहे. आयोगास सुमारे एक लाख 87 हजार निवेदने प्राप्त झाली असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. 

न्यायालयात आरक्षणाची बाजू भक्कमपणे टिकावी, यासाठी राज्य मागास आयोगाचा अहवालाचा पाया भक्कम हवा. जेणेकरून आरक्षण मिळावे, यासाठी न्यायालयात बाजू ठामपणे मांडता येईल. अहवालाच्या कामासाठी आवश्यक ती मदत राज्य शासनाने आयोगास वेळोवेळी केली आहे. यापुढेही आवश्यक ती मदत देण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. या शिष्टमंडळात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदींचा समावेश होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages