Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शिवसेना भाजपच्या नेत्यांना कंत्राटदारांकडून दलाली खाण्यात जास्त इंटरेस्ट - संजय निरुपम


मुंबई - ४८ तासांत मुंबईतील सर्व खड्डे बुजवण्याचे महापालिकेने आश्वासन दिले होते. आज त्या आश्वासनाचा शेवटचा दिवस तरीसुद्धा आजही मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. हे शिवसेना - भाजप प्रणित महापालिका आणि महाराष्ट्र शासनाचे फार मोठे अपयश आहे. शिवसेना भाजपच्या नेत्यांना पालिकेत बसून कंत्राटदारांकडून दलाली खाण्यात जास्त इंटरेस्ट आहे, हेच यातून दिसून येते, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर केला.

मुंबईमध्ये वांद्रे पश्चिम येथील शर्ली राजन रोडवर मुंबई काँग्रेस तर्फे करण्यात आलेल्या खड्डे मोजा, खड्डे बुजवा या आंदालनादरम्यान ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, ४८ तासांची खड्डे भरण्याची डेडलाईन संपत आलेली आहे. तरीही मुंबईतील सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. संपूर्ण मुंबई खड्ड्यांनी भरलेली आहे. मुख्यमंत्री नागपूरमध्ये विधानभवनात म्हणतात की, मुंबईतील सर्व खड्डे बुजवलेले आहेत. मुंबई मनपा आयुक्त स्टँडिंग कमिटी मिटिंग मध्ये म्हणतात की, मुंबईत सर्व काही ठीकठाक चालले आहे. पण आज आम्ही या शर्ली राजन रोडवर खड्डे मोजले. १५० च्या आसपास खड्डे आहेत. यातील काही खड्डे आम्ही बुजवले आहेत. खड्डे बुजवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आलेले आहे. 

मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारला त्यांच्या अपयशाची जाणीव करून देण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा आमचा प्रतीकात्मक प्रयत्न आहे. मुंबईकर लोकांना चांगले रस्ते बनवून देणे, रस्ते खड्डेमुक्त करणे ही महापालिका आणि महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहेत. ज्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले आहेत आणि यासाठी त्यांनी सर्व मुंबईकर जनतेची माफी मागायला हवी. गेल्या दोन दिवसांत मुंबई जवळील कल्याण आणि सानपाडा येथे ५ जणांचा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे. देवाच्या कृपेने मुंबईत अजून अशी घटना घडलेली नाही. तेव्हा महापालिकेत बसलेल्या शिवसेना भाजपची ही जबाबदारी आहे की मुंबई कोणाचाही खड्ड्यात पडून जीव जाण्याअगोदर त्यांनी समोरून यावे आणि खड्डे बुजवावेत. मग खड्डे का बुजवले गेले नाहीत. याचे कारण नं. १ रस्ते बनवण्याच्या प्रक्रियेत फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांकडून शिवसेना भाजपच्या लोकांनी दलाली खाल्ली, कमिशन खाल्ले. ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना रस्ते बनवण्याचे कंत्राट देण्यात आले. यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आले. दुसरे कारण असे की, मुंबईतील रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत. त्यांना बुजवण्यासाठी २,५०० टन कोल्ड मिक्स ची आवश्यकता आहे. पण सद्यस्थितीत मुंबई महापालिकेकडे एकूण ४० टन कोल्ड मिक्स उपलब्ध आहे. आता ४० टन कोल्ड मिक्सने रातोरात मुंबईतील सर्व खड्डे बुजवणे शक्य नाही. पण माझा मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य शासनाला एक प्रश्न आहे की, मुंबई महापालिका या परिस्थितीसाठी तयार का नव्हती, जर मुंबई महापालिकेला हे माहित आहे की, मुंबईतील रस्त्यांवर अतिवृष्टीमुळे रस्त्यावर खड्डे पडू शकतात. मग ते बुजवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच करायला हवी होती, जी त्यांनी केली नाही. सावधगिरी बाळगली नाही. यावरून त्यांना मुंबईकरांची किती चिंता आहे हे दिसून येते.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेचे ३० हजार करोड चे बजेट आहे. यातील ३ हजार करोड रुपये रस्त्यांवर खर्च केले जातात. तरीही मुंबईत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले गेले. दोन वर्षांपूर्वी ज्या कंत्राटदारांना रस्ता घोटाळ्यामध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते. मुंबईकरांच्या दुर्भाग्याने अशा कंत्राटदारांना पालिकेत बसणाऱ्या शिवसेना भाजपच्या लोकांनी पुन्हा कंत्राट दिली. या कंपन्यांना नावे बदलून कंत्राटे देण्यात आली. यासाठी मनपा अधिकारी, स्थानिक नगरसेवक, मनपा आयुक्त यांनी मोठ्या प्रमाणात कमिशन खाल्ले. हा एक फार मोठा भ्रष्टाचार आहे. संपूर्ण महापालिका प्रशासन भ्रष्टाचाराने ग्रासलेले आहे. नालेसफाई घोटाळा, कचरा व्यवस्थापनामध्ये घोटाळा आणि आता हा रस्ता घोटाळा. जोपर्यंत हे घोटाळेबाज शिवसेना भाजप सरकार वठणीवर येत नाही. तोपर्यंत या घोटाळेबाज सरकारचा बुरखा फाडण्याचे काम काँग्रेस पक्ष करत राहणार आहे. आमचे आंदोलन असेच सुरु राहील.

या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी, आजी-माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom