फूडमॉल, मल्टिप्लेक्समध्ये अधिक दराने खाद्य पदार्थांची विक्री केल्यास कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 July 2018

फूडमॉल, मल्टिप्लेक्समध्ये अधिक दराने खाद्य पदार्थांची विक्री केल्यास कारवाई


नागपूर - राज्यातील फूडमॉल व मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री छापील किंमतीपेक्षा अधिक दराने होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यादा दराने विक्री केल्यास त्यांच्यावर वैधमापन शास्त्र अधिनियम, 2009 व वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियम 2011 नुसार कारवाई करण्यात येईल,अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.
फूडमॉल व मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांची विक्री छापील किंमतीपेक्षा अधिक दराने होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना चव्हाण बोलत होते. ते म्हणाले,महाराष्ट्र चित्रपटगृहे नियम 1966 च्या कलम 121 नुसार प्रेक्षकांना चित्रपटगृहे,फूडमॉल व मल्टिप्लेक्समध्ये स्वत:चे खाद्यपदार्थ, पाणी नेण्यास बंधन घालता येत नाही. शिवाय सिनेमागृहात चित्रपट सुरू असतानाही खाद्यपदार्थ किंवा पेय विक्री करता येत नाही. जैनेंद्र बक्षी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार न्यायालयाने पदार्थांची जादा दराने विक्रीबाबतचे धोरण ठरविण्याबाबत गृह विभागाला आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

जून 2018 अखेर राज्यातील मल्टिप्लेक्स, मॉल आदी 44 आस्थापनांची चौकशी केली असून छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या तीन आस्थापनाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व फूडमॉल व मल्टिप्लेक्स, सिनेमागृह मालकांना नियमानुसार वागण्यास व कोणावरही बंधन घालू नयेत, ग्राहकांची अडवणूक करू नये, असे निर्देश दिले आहेत, तसे झाल्यास 1 ऑगस्टपासून कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य नीलम गोऱ्हे, संजय दत्त, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

Post Bottom Ad