मुंबई 6/7/2018 - सद्याच्या धावपळीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वेळेत औषधोपचार करता यावेत यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये सुसज्ज रोगनिदान केंद्र सुरु करावे अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आले आहे. येत्या महापालिका सभेत ही सूचना मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबई शहराची वाढती लोकसंख्या ,दळणवळण व नोकरी व्यवसायानिमित्ताने होणारा प्रवास यामुळे नागरिकांचे जीवन धावपळीचे झाले आहे. सर्वसामान्य नागरिक कामाच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक नागरिकांना उच्च रक्तदाब , मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रासले आहे, हे लक्षात येत नाही. तसेच या आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या वेगाने वाढते आहे. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेत औषधोपचार करून ते नियंत्रणात ठेवण्यासाठी विहित कालावधीमध्ये रक्त तपासणी इत्यादी चाचण्या करणे गरजेचे आहे. परंतु यासाठी खाजगी रोगनिदान केंद्रामध्ये भरमसाठ शुल्क आकारण्यात येते. ते नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे या औषधोपचारापासून वंचित राहतात. मुंबई शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने ,महानगरपालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांमध्ये सुसज्ज रोगनिदान केंद्र सुरु करावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक अतुल शाह यांनी ठरावाच्य़ा सूचनेद्वारे केली आहे.