मुंबई - बँकेच्या क्रेडिट कार्ड सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी करून माटुंगा येथील महिलेला एक लाखांना गंडा घालणाऱ्या दिल्लीच्या तीन भामट्यांना माटुंगा पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. साहिल हाशमी (२०), विपीन पाल (२०) आणि रवीकुमार माथूर (२२) अशी यातील आरोपींची नावे आहेत..
माटुंगा येथे राहणाऱ्या मनपा अधिकाऱ्याच्या पत्नीला ३ जुलै रोजी निनावी फोन आला. एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून यातील आरोपीने तुमचे कार्ड बंद होणार असून ते चालू ठेवण्यासाठी कार्डची डिटेल द्या, असे सांगितले. क्रेडिट कार्ड बंद होण्याच्या भीतीने त्यांनी फोन करणाऱ्याला क्रेडिट कार्डची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी नंबर आले. ते नंबरदेखील फोन करणाऱ्याला दिले. ओटीपी नंबर मिळताच आरोपींनी मनपा अधिकाऱ्याच्या पत्नीच्या क्रेडिट कार्डवरून चार ट्रान्झॅक्शन करून एक लाख रुपये आपल्या बँक खात्यात वळवले. दरम्यान, आपल्या बँक खात्यातून पैसे जात असल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर मनपा अधिकाऱ्याच्या पत्नीने तत्काळ कॉल सेंटरला कॉल करून आपले कार्ड ब्लॉक केले. वेळीच कार्ड ब्लॉक झाल्यामुळे आरोपींनी केलेले चौथे ट्रान्झॅक्शन रद्द झाले. त्यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मनपा अधिकाऱ्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटणकर, उपनिरीक्षक मारुती शेळके, अंमलदार विकास मोरे आणि संतोष पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून यातील आरोपींना दिल्ली येथे धाव घेऊन अटक केली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी साहिल हा मुख्य आरोपी दिल्ली येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता. सर्व कामकाज शिकल्यानंतर त्याने कॉल सेंटर सोडले आणि लोकांना फसवण्यास सुरुवात केली. यासाठी विपीन त्याला बँक खाती आणि सिमकार्ड पुरवण्याचे काम करायचा, तर म्होरक्या साहिल लोकांना बँकेतून बोलत असल्याचा फोन करायचा व त्यांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यावरील पैसे वळते करून घ्यायचा. असे तपासात उघड झाले आहे.