मुंबई - मुंबईतील तसेच राज्यभरातील अनेकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकारणाऱ्या म्हाडा भवनाच्या कार्यालयाचा कायापालट होणार आहे. मुख्यालयाच्या जागी १६ मजल्यांची भव्य इमारत उभी राहणार आहे. ४० वर्ष जुन्या म्हाडा भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडा मुंबई मंडळाने घेतला आहे. सध्या म्हाडा मुख्य भवनाच्या पुनर्विकासाला वेग आल्याची माहिती म्हाडा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गरीबांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कार्यालयातील स्लॅब काही महिन्यांपूर्वी कोसळला होता. इमारतीला काही ठिकाणी टेकू लावण्यात आला आहे. इमारतीच्या दुरुस्तीचा खर्च कोट्यवधी रुपयांचा खर्च मुंबई मंडळाला येतो. त्यामुळेच इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत मुंबई मंडळ विचाराधीन आहे. गेले काही वर्ष पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आता मात्र पुनर्विकासासाठी किती एफएसआय असावा, इमारत किती मजली असावी, आराखडा कसा तयार करावा अशा अनेक चर्चा सध्या मुंबई मंडळात सुरू आहे. म्हाडाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यात येत आहे. त्यामुळे ५ एफएसआय वापरून १६ मजली कॉर्पोरेट लूकची इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे काही मजले इतर कार्यालयांसाठी भाड्याने देण्यात येणार आहेत. या पुनर्विकासासाठी ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.