मुंबई - कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार लक्ष पोस्ट लार्व्हा क्षमतेचे दोन मोठे आणि प्रत्येकी 50 लक्ष पोस्ट लार्व्हा क्षमतेची पाच छोटे कोळंबी बीज उत्पादन केंद्र स्थापन करावयाची आहेत. त्यासाठी अनुदान लागू असून इच्छुक व्यक्ती, संस्था व कंपन्यांनी विस्तृत प्रकल्प अहवालासह दि. 12 ऑगस्ट 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.
ठाणे- पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी एक आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 2 हजार लक्ष पोस्ट लार्व्हा क्षमतेचे एक कोळंबी बीज उत्पादन केंद्रे स्थापन करावयाची आहेत. यासाठी 460 लक्ष रुपये प्रती कोळंबी बीज केंद्र खर्च ग्राह्य धरण्यात आला असून त्यापैकी 25 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक प्रतिकेंद्र 50 लक्ष क्षमतेची 5 कोळंबी बीज केंद्रे स्थापन करावयाची आहेत. त्यासाठी 50 लक्ष रुपये प्रती कोळंबी बीज केंद्र खर्च ग्राह्य धरण्यात आला असून त्यापैकी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत दिनांक 28 मार्च 2018 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. प्रकल्पाबाबतच्या अटी, शर्ती व इतर माहिती या निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांनी त्यांचे स्वयंस्पष्ट प्रस्ताव विस्तृत प्रकल्प अहवालासह (डी.पी.आर.) मत्स्यव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, तारापोरवाला मत्स्यालय, चर्नीरोड, मुंबई (दूरध्वनी क्र. 022-22821239) येथे दिनांक 12 ऑगस्ट पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय सहआयुक्त रा. ज. जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.