मुंबई - महाराष्ट्र राज्यासह देशातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुकूल असून, लवकरच कायमस्वरूपी स्वतंत्र आयोग निर्माण होणार आहे. नीती आयोगाने त्यास मंजुरी दिली आहे, असे उद्गार भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी काढले..
कांदिवली येथे भटक्या विमुक्त जाती जमाती विकास परिषदेच्या माध्यमातून गोंधळीपाडा येथे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात इदाते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशातील हा पहिला आयोग आहे. ज्याचा केंद्र सरकारने कमी कालावधीत स्वीकार केला आहे. राज्यात राज्य मागासवर्ग आयोग आहे, पण केंद्रात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रश्नांसाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने भटक्या विमुक्तांच्या जाती जमातीची कुचंबणा होत आहे. स्वातंत्र्यानंतर भटक्या विमुक्तांची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली असून, त्यांनी या आयोगास मान्यता दिल्याने देशातील भटक्या विमुक्त जाती जमातींचे प्रश्न सुटतील, असा विश्वास इदाते यांनी व्यक्त केले. मुंबईमध्ये एक प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारले जाणार आहे, त्याचा देखील समाजासाठी उपयोग होईल, असा विचार त्यांनी बोलून दाखवला. या वेळी अतुल भातखळकर यांनी इदाते यांच्या कार्याचे कौतुक करून ते समाजासाठी गेल्या ४० वर्षांपासून झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता या समाजाच्या उन्नतीसाठी सरकरही साथ देईल, असा विश्वास व्यक्त केला. माझ्या मतदारसंघात भटक्या विमुक्त समाजाचे अनेक जण असून त्यांच्यासाठी आपण वेळोवेळी मदत केली आहे आणि यापुढेही मदत करू, असे आश्वासन दिले. नवीन बस स्थानक उभारले आहे, तिथे गोंधळी समाजाच्या दिव्यांग मुलीला स्टॉल उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंखे यांनी केले, तर नगरसेविका सुरेखा पाटील, सहदेव रसाळ, अनिल फड यांची समोयचीत भाषणे झाली. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे प्रतिनिधी सुधीर शिंदे, जिल्हा भटके विमुक्त आघाडीचे दत्तात्रय महाजन, गोंधळी समाजाचे अध्यक्ष मारुती साळुंके, वडार समाजाचे मंगेश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.