बकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट - विखे पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2018

बकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट - विखे पाटील

मुंबई - येत्या बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा हिंसाचार आणि धार्मिक दंगली घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट असल्याचे नालासोपारात सापडलेल्या स्फोटकांमुळे स्पष्टपणे दिसून येत असून, आता तरी राज्य सरकार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करणार का? अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नालासोपारा येथे बॉम्ब आणि स्फोटकांचा साठा आढळून आल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या प्रकरणी एटीएसने ताब्यात घेतलेल्या व सनातन आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित वैभव राऊत नामक तरूणावर पूर्वीपासून दंगलींचे गुन्हे दाखल आहेत. नेमका त्याच्याकडे बॉम्बचा साठा सापडणे आणि त्याच्या बचावार्थ हिंदू जनजागृती समितीने हा ‘मालेगाव पार्ट-2’ असल्याचे जाहीर करणे, ही बाब धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचे कारस्थान शिजत असल्याचा स्पष्ट संकेत आहे. या समितीने ‘मालेगाव पार्ट-2’ हाच शब्द का निवडावा? असा सूचक प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्येमध्ये सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या कट्टरवादी संघटनांवर संशय व्यक्त केला जातो आहे. या चारही हत्यांसाठी वापरलेली गेलेली पिस्तुले सारखीच होती, हे स्पष्ट झाले आहे. या खटल्यांचा भविष्यात काय निकाल लागेल, हा भाग अलाहिदा आहे. मात्र खबरदारीचा उपाय आणि भविष्यातील अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच कट्टरवादी संघटनांवर तातडीने बंदी घालण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिक वेळ न दवडता आणि उदासीन दृष्टीकोन सोडून अशा संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात भाजप-शिवसेनेचे राज्य सरकार केंद्राशी बोलणी करणार का? अशी विचारणाही विखे पाटील यांनी केली आहे.

येत्या 20 ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पाचवा स्मृतीदिन असून, सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या संघटनांवर बंदी घालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. डॉ. दाभोळकरांचे मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्याकांडाचाही तपास अपेक्षित वेगाने होताना दिसून येत नाही. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांनी वेगाने तपास करून ठोस पुरावे गोळा केले. महाराष्ट्र पोलिसांकडून मात्र तशी तत्परता दिसून आलेली नसल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad