
नवी दिल्ली - नोटांमुळे मानवाला गंभीर आजार जडू शकतात, असा तर्क देत या आजारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी थेट पत्र लिहिण्यात आले आहे.
व्यापारीक मंडळ 'दि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने अर्थात सीएआयटी नोटांपासून जडणाऱ्या आजारांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. नोटा मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत. त्या प्रदूषित असतात. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचू नये तसेच अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना सूचवण्यात याव्यात, अशी मागणी सीएआयटीने केली आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री, अर्थमंत्री व विज्ञान-तंत्रज्ञान मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. सीएआयटीने विविध सर्वेक्षणांचा हवाला दिला असून, या प्रकरणात लक्ष घालण्याचा आग्रह केला आहे. नोटा विषाणू व कीटक नाशकांनी दूषित झालेल्या असतात. म्हणून लघुशंका व श्वसनमार्गे त्वचारोग, मेनिंजाइटीस, टॉक्सिक शॉक सिंड्रोम व विविध प्रकारचे रोग मानवाला नोटांमुळे होऊ शकतात, असे वृत्त वेळोवेळी माध्यमांनी दिले आहे. त्याचा संदर्भसुद्धा सीएआयटीने दिला आहे.