Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव मंडप परवानग्या तांत्रिक कचाट्यात


मुंबई - गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना विविध तांत्रिक कारणांमुळे मुंबई महापालिकेने तब्बल २८१ मंडळांना मंडपासाठीची परवानगी नाकारली आहे. शिवाय मंडप परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदतही संपल्यामुळे या गणेशोत्सव मंडळांची धावपळ उडाली आहे. त्यामुळे ज्यांना परवानग्या मिळालेल्या नाहीत, अशा परवानग्यांबाबत पालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

गणेशोत्सवासाठी पालिकेकडे यावर्षी ३४९९ इतके अर्ज आले. मात्र पालिकेने यावर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाइन परवानगीच्या घोळामुळेच अनेक मंडळांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या असा आरोप गणेशोत्सव समितीने केला आहे. दरम्यान विविध कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे २८१ मंडळांना मंडप परवानगी नाकारली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामध्ये दोन वेळा अर्ज केल्याने ७५९ अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर आतापर्यंत २७४० मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर २९६ परवानग्या देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ७९ टक्के परवानग्या देण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त ११ टक्के परवानग्या देण्याचे काम सुरू असून १० टक्के मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

तोडगा काढण्यासाठी बैठक --
२८१ मंडळांना परवानगी नेमकी कोणत्या कारणामुळे नाकारण्यात आली आहे, याची माहिती पालिका प्रशासनाकडून घेतली जाईल. याबाबत महापौर, पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकार्‍यांशी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाणार असल्याचे मंडळांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सवात मंडप परवानगीची कोणतीही अडचण येऊ देऊ नका असे निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात मंडळांना परवानगीबाबत कोणतीही समस्या येणार नाही.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom