नवी दिल्ली - प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशात 5 कोटीहून अधिक गॅस कनेक्शन्स देण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ऑगस्ट 2018 अखेर 29 लाखाहून अधिक गॅस कनेक्शन्स देण्यात आले आहेत.
देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना गॅस जोडणी देण्याऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी केला होता. या योजनेच्या माध्यमातून देशातील 5 कोटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी गॅस जोडणी देण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रात या योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर 2016 मध्ये करण्यात आला. गेल्या 22 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात 29 लाख 27 हजार 326 गॅस कनेक्शन्स देण्यात आली आहेत. ऑक्टोबर 2016 ते 31 मार्च 2017 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात 8 लाख 58 हजार 808 गॅस कनेक्शन्स देण्यात आले होते, तर गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत 20 लाख 68 हजार 518 गॅस कनेक्शन्स देण्यात आले आहेत.
देशात 5 कोटीहून अधिक गॅस कनेक्शन्स .....
ऑगस्ट 2018 अखेर देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 5 कोटी 41 लाख 22 हजार 550 गॅस कनेक्शन्स देण्यात आली आहेत. देशात सर्वाधिक गॅस जोडणी देणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार,पश्चिम बंगाल व राज्यस्थान या सात राज्यांचा समावेश आहे.