२०१८ पर्यंत १० हजार गृहनिर्मितीचे दावे फोल ठरले - उदय सामंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2018

२०१८ पर्यंत १० हजार गृहनिर्मितीचे दावे फोल ठरले - उदय सामंत


मुंबई - म्हाडाने २०२२ पर्यंत १५ हजार आणि २०१८ पर्यंत १० हजार घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, काही कारणांमुळे गृहनिर्मितीचे सर्व दावे फोल ठरले असून आतापर्यंत केवळ अडीच हजार घरांची निर्मिती करण्यास म्हाडाला यश आल्याचे म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी निदर्शनास आणून दिले. म्हाडा पत्रकार कक्षाला दिलेल्या भेटीदरम्यान आयोजित पत्रकार संवाद परिषदेत सामंत बोलत होते.

म्हाडाच्या अध्यक्षपदी सोमवारी उदय सामंत यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मंगळवारी त्यांनी पत्रकार कक्षाला भेट दिली. या भेटीदरम्यान म्हाडाच्या गृहनिर्मितीच्या उद्देशाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेला साकारण्यासाठी देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाच्या माध्यमातूनही केवळ मुंबईत २०२२ पर्यंत १५ हजार २२९ घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठरवण्यात आले तर २०१८ पर्यंत १० हजार ५७६ घरांच्या निर्मितीचे लक्ष्य म्हाडा अधिकाऱ्यांनी ठरवले होते. त्याबाबत शासनदरबारी माहिती सादर केली, मात्र प्रत्यक्षात मागील ३ वर्षात अडीच हजार घरांची निर्मिती करण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. एकूण गृहनिर्मितीचे लक्ष्य आणि प्रत्यक्षातील गृहनिर्मितीचे यांचे प्रमाण व्यस्त असल्याने जर कोणताही म्हाडा अधिकारी आम्ही गृहनिर्मितीचे लक्ष्य पूर्ण करू, असे सांगत असेल तर ते साफ खोटे असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.

भविष्यात गृहनिर्मितीतील गुणवत्ता वाढवून घरांच्या किंमती कमी करायच्या असतील तर नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी या वेळेस दिली. यासाठी अधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करू, असेही सामंत यांनी सांगितले. म्हाडा अध्यक्ष म्हणून आता वर्णी लागली असली तरीही २००४ रोजी सर्वसामान्य जनता या प्रवर्गातून आपण स्वत: म्हाडा घरांसाठी अर्ज केल्याची आठवण उदय सामंत यांनी या वेळेस बोलून दाखवली.

Post Bottom Ad