रोजगार देणारा शिस्तबद्ध आणि पारदर्शी मेळावा - सुभाष देसाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2018

रोजगार देणारा शिस्तबद्ध आणि पारदर्शी मेळावा - सुभाष देसाई

ठाणे - युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा इतका शिस्तबद्ध आणि पारदर्शी मेळावा देशातील कुठल्याही राज्यात होत नसेल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याविषयी बोलतांना सांगितले. या उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, झोपडपट्टी पुनर्वसनचे विजय नाहटा आदींची उपस्थिती होती.

नवी मुंबई येथे सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य सभागृहात आयोजित या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पुण्यानंतर नवी मुंबईतील हा उद्योग विभागाचा दुसरा मेळावा होता, सुमारे 8 हजार 750 युवक युवतींनी यासाठी नोंदणी केली होती तसेच 175 कंपन्यांनी यात सहभागी घेतला होता. सीआयआयने या मेळाव्यासाठी सहकार्य केले होते. आजच्या दिवशी नोंदणी केलेल्यांपैकी 4 हजार 707 उमेदवार उपस्थित होते, 3 हजार 306 मुलाखती होऊन 1602 जणांना ऑफर लेटर्स देण्यात आली. उर्वरित जणांचे बायोडाटा संकलित करण्यात येऊन सीआयआयच्या कार्यालयामार्फत विशेष कक्षातून इतर नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी संधी शोधण्यात येईल, अशी माहिती मिळाली.

सुभाष देसाई बोलतांना म्हणाले की, या मेळाव्यास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यामागे उद्देश हाच आहे की बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच मराठी तरुणांना नोकऱ्या देणारी चळवळ सुरू झाली. एअर इंडिया, रेल्वे, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या अशा ठिकाणी नोकऱ्या मिळणे सुरू झाले. यापुढील काळात असे मेळावे घेण्यात येणार असून प्रत्येक मेळावा चोख आणि पारदर्शी व्हावा असे नियोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी युवकांना जागीच संबंधित कंपन्यांतर्फे मुलाखती घेऊन ऑफर लेटर्स देण्यात येत असून ज्यांची निवड होणार नाही त्यांना पुढील काही दिवसांत उद्योग विभागाच्या कार्यालयांत मुलाखती घेऊन त्यांना देखील उचित कंपन्यांत नोकरी मिळेल यासाठी मार्गदर्शन केले जाईल, राज्यात गुंतवणूक वाढत असून नोकरीच्या संधी देखील यामुळे वाढणार आहेत असेही उद्योगमंत्री म्हणाले.

Post Bottom Ad