बेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2018

बेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला


मुंबई - मुंबईकरांची सेकंड लाइफ लाइन असलेल्या बेस्टची आर्थिक स्थिती चांगली नाही. बेस्टची एकीकडे प्रवासी संख्या घटत असताना वाढत्या वाहतूक कोंडीमुळे गर्दीच्या वेळी बेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला असल्याचे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये बेस्ट बसचा गर्दीतील वेग १६ किमीवरून १४ किमी प्रतितास, २०१६ मध्ये १२ किमी प्रतितास आणि २०१८ मध्ये ९ किमी प्रतितासावर आला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या बेस्टचा तोटा वाढत आहे.

बेस्ट उपक्रमाच्या महसुलात घट होत असून, परिचलन तोट्यात वाढ होत चालली आहे. या तोट्यात वाया जाणाऱ्या इंधनाचाही समावेश आहे. बेस्टचा तोटा २००८ मध्ये ४५० कोटी रुपये होता, तो २०१८ मध्ये १ हजार कोटी रुपये इतका झाला. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३,३३० बस असून दैनंदिन प्रवासी संख्या २५ लाख इतकी आहे. २००८ मध्ये बेस्टच्या बसचे दैनंदिन प्रवासाचे सरासरी अंतर २०० किमीपर्यंत होते. दशकभरात हे अंतरही घटले असून त्याचे प्रमाण १६९ किमीपर्यंत पोहोचले आहे. ताफ्यातील बसची एकूण संख्या पाहिल्यास त्यामुळे होणारा तोटा हा प्रत्येक दिवशी लाखांपर्यंत पोहोचत आहे. त्यामागे गर्दीच्या वेळेस वाहतूक कोंडी आणि बसच्या वेगातील घट कारणीभूत असल्याचे समजते. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार २००८ मध्ये खासगी वाहनांची संख्या ५ लाख होती, ती संख्या आता १० लाखांवर गेली आहे. २००८ मधील एकूण वाहनांची संख्या १६ लाखांवरून ३५ लाख इतकी झाली आहे. मात्र, बेस्ट ताफ्यातील बसची संख्या ४,२०० वरून ३,३३० इतकी घटली आहे. बेस्टच्या गाड्यांचा सरासरी वेग कमी होण्यामागे मेट्रोची कामे, खासगी वाहनांमधील वाढ, खराब रस्ते/खड्डे, अवैध पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे ही प्रमुख कारणे ठरली आहेत. विशेषता जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी-कुर्ला रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (कपाडिया सिग्नलजवळ), पश्चिम द्रुतगती महामार्ग (दहिसर ते वांद्रे), मालाड-गोरेगाव कार्यालय हब, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड (चकाला-घाटकोपर), धारावी-सायन लिंक रोड (वांद्रे ते सायन), सायन-पनवेल रोड (सायन-वाशी), डी. एन. रोड (सीएसएमटी-कुलाबा/कफ परेड) या दहा मार्गावर बेस्टला जास्त फटका बसला आहे. 

Post Bottom Ad