महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका प्रशासन सुसज्ज - आयुक्त अजोय मेहता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2018

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका प्रशासन सुसज्ज - आयुक्त अजोय मेहता


मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ६ डिसेंबर, २०१८ रोजी असणाऱया ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात वाढ केली असून दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात येणाऱया विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासन सतर्क व सुसज्ज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात योग्‍य समन्‍वय साधून योग्‍य सेवा पुरविण्‍याचे आदेशही आयुक्‍तांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १३ नोव्हेंबर, २०१८) महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, पोलिस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी मेहता आढावा बैठकीत बोलत होते.

महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्यभूमी येथे येणाऱया अनुयायांकरीता उत्तमोत्तम विविध नागरी सेवा-सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिका गेल्‍या अठरा वर्षांपासून पुरवित असून शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळया ठिकाणी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱया अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची नळ व्यवस्था, पाण्‍याचे टँकर्स, कर्मचारी व वाहतूक व्‍यवस्‍थेसाठी संपूर्ण परिसरात स्‍वच्‍छता, संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था, बसण्यासाठी बाकडे याही सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनातर्फे तयारी सुरु आहे. महापालिका आयुक्‍त  मेहता यांनी यावेळी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेण्‍यासाठी येणारा अनुयायी शिस्‍तबद्ध असतो, असे सांगून प्रत्‍येक ५० मीटर अंतरावर कचराकुंडी व दर्शन रांगेतील अनुयायांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था आणखीन उत्‍कृष्‍टप्रकारे करण्‍यात यावी.

स्वच्छतेच्या अनुषंगाने २६४ कर्मचाऱयांची प्रती पाळीव्‍यवस्‍था करण्यात आली असून हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील. कर्मचाऱयांवर ताण पडू नये यांसाठी सफाई कर्मचाऱयांची कामाची वेळ आठ तासांवरुन सहा तास करण्यात आली आहे. समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबत राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळायाठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही मेहता यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था, वंदनीय भंन्‍तेजी यांच्यासाठी भारत स्‍काऊटचे गाईड येथे निवासाची व्यवस्था, शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात माहिती कक्ष / निरीक्षण मनोरे, २ ड्रोन कॅमेरे, ११ रुग्णवाहिकेसहीत सुसज्ज आरोग्य सेवा, अनुयायांसाठी ६० क्लोज सर्कीट टीव्‍ही, फिरते कॅमेरे, दूरचित्रवाहिनी, ४४ मेटल डिटेक्टर, १० बॅग स्कॅनर्स, ६० हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर, विद्युत व्यवस्था (३५० टयुबलाईटस्, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅन), १०० डिलक्स व ३५० प्लास्टीक खुर्च्या, लाकडी मेज (टेबल), ध्वनिक्षेपण व्यवस्था, ३०० चार्जिंग पॉईंटस्, २८० फिरती शौचालये, २६० स्नानगृह, ४ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी व ४८ जलसुरक्षा रक्षक, शिवाजी पार्क येथे ५१९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था, १६ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, १४ हजार चौ.मी. वर धूळप्रतिबंधक आच्छादक, २६० न्हाणीघरांमध्ये शॉवरची व्यवस्था, आपत्‍कालीन परिस्थितीत १० हजार अनुयायांसाठी महापालिका शाळांमध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था, बसण्यासाठी ६० बाकडे या सुविधांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी येणाऱया अनुयायांसाठी वैद्यकीय मदत व सहाय्य देण्‍यासाठी आरोग्‍य व्‍यवस्‍थेत डॉक्‍टरांची संख्‍या अधिक करण्‍याचे सांगितले. रांगेतील अनुयायांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, कुपरेज मैदान येथे शौचालयांची व्‍यवस्‍था, अनुयायी ज्‍या-ज्‍या स्‍टेशनवर उतरतात, त्‍याठिकाणी सकृतदर्शनी मोठे दिशादर्शक फलक तसेच चैत्‍यभूमीवर जाणारी बस क्रमांकासह नोंद करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले.

Post Bottom Ad