माहुलवासियांचे कुर्ल्यातल्या संक्रमण शिबिरात पुनर्वसन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2018

माहुलवासियांचे कुर्ल्यातल्या संक्रमण शिबिरात पुनर्वसन

मुंबई - न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी माहुलवासीय गेले १६ दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या १५ व्या दिवशी रविवारी सायंकाळी माहुलवासीयांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनानंतर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत माहुल वासियांचे कुर्ल्यात एचडीआयएलने बांधलेल्या संक्रमण शिबिरांमध्ये पुनवर्सन केले जाईल असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह माहुलवासियांची मेहता यांनी मंत्रालयात आपल्या दालनात बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी आश्वासन दिले. मेहता यांच्या या आश्वासनानंतर दिलासा मिळाला असला तरी आपल्याकडून सुरू करण्यात आलेले आंदोलन हे नवीन घर मिळेपर्यंत सुरूच राहील असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सांगितले.

मुंबईतील विविध ठिकाणच्या झोपडपट्या तसेच पाईपलाईनच्या आजूबाजूच्या झोपडपट्यांमधील सुमारे ५ हजार कुटुंबियांचे माहुल गाव परिसरात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जीवघेण्या प्रदुषणामुळे अनेकांचे जगणे कठिण झाले असून त्याविरोधात मागील अनेक महिन्यांपासून येथील रहिवाशी आंदोलन करत आहेत. मागील 16 दिवसांपासून विद्याविहार येथील पाईपलाईन या पहिल्या जागी ते उघड्यावर कुटुंबासोबत राहत असून न्यायासाठी तेथेच आंदोलन सुरु केले आहे. त्यांची दिवाळीही उघड्यावर गेली. पालिका व राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त शेकडो आंदोलकांनी रविवारी तीन किमीहून अधिक लांब अशी मानवी साखळी धरत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या निवासस्थाला घेराव घातला हेाता. त्या पार्श्वभूमीवर दखल घेत मेहता यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक बोलावली हेाती. त्यात मेहता यांनी येथील रहिवाशांचे विमान प्राधिकरणाने एचडीआयएलने बांधलेल्या घरांपैकी तब्बल ५ हजार ५०० घरे शिल्लक आहेत. त्या घरांमध्ये सर्वांचे पुनर्वसन केले जावे अशी आपली भूमिका आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले. 

या रहिवाशांसाठी आपण मागेही पाठपुरावा केला हेाता, याची माहिती मेहता यांनी या बैठकीत देत अनेक कागदपत्रेही दाखवली असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या. ज्या माहुलमध्ये महापालिकेने लोकांचे पुनवर्सन केले, त्यांच्यासाठी आत्तापर्यंत दुसरीकडे घरे उपलब्ध नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले तर दुसरीकडे विमान प्राधिकरणाने बांधलेली ५ हजारांहून अधिक घरे ही मागील १५ वर्षांपासून कुर्ल्यात पडून असल्याचे आम्ही सरकारला दाखवून दिल्यानंतरही महापालिका त्यासाठी सकारात्मक नव्हती असा आरोपही पाटकर यांनी केला. मागील १६ दिवसांपासून येथील नागरीक, महिला, मुले ही‍ आपली घरे सोडून रस्त्यावर बसली असून त्यांना सरकारने आश्वासन दिलेले असले तरी ते त्यांना नवीन घर मिळेपर्यंत रस्त्यावरून उठून जाणार नाही असेही त्या म्हणाल्या

लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक --
कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय होईपर्यंत संबंधित कुटुंबांना एचडीआयएल येथे ट्रान्झीस्टची घरे देता येणे शक्य आहे. तसेच त्याच जागेवर पुनर्वसन करण्याची शक्यता तपासली गेली पाहिजे. हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी तसेच संबंधित अन्य विभाग यांच्यासह मुख्यमंत्री यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. या भागातील विविध कारखान्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. न्यायालयाने या प्रश्नी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबई महानगर पालिकेने पुनर्वसनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या बाबत शासनाने महानगरपालिकेला कळविले आहे, असेही मेहता यांनी सांगितले.

Post Bottom Ad