रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर, शांतीसागर वसाहत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर, शांतीसागर वसाहत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय

Share This
मुंबई, दि. 14 : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतल्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज मंत्रालयात सांगितले. रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

महेता म्हणाले, रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी जवळपास 155 एकरावर उभी आहे. कित्येक वर्षापासून या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सन 2007 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा टाऊनशिपच्या माध्यमातून विकास करु, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर या पुनर्विकासाला स्थगिती दिली. आता ही स्थगिती उठविण्यात आली असून टाऊनशिपच्या माध्यमातून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सुरु असलेल्या योजनांची सद्यस्थिती, त्यातील अडचणींबाबत विकासकांशी चर्चा करुन सध्याची सुरु असलेली व प्रस्तावित योजना टाऊनशिप, ‘स्पेशल प्रोजेक्ट’, म्हणून करण्यासंबंधीची माहिती अहवालात नमूद करावी तसेच आर्थिकदृष्ट्या शासनाची गुंतवणूक करुन योजना पुढे कशी नेता येईल, यासंबंधी एका महिन्याच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी श्री. महेता यांनी अधिकाऱ्यांना दिले. विभागाच्या अभिप्रायासह अहवाल सादर झाल्यावर मुख्यमंत्र्यांना सादर करुन पूर्ण रमाबाई नगर, कामराज नगर एकत्रित विकासाचा अंतिम निर्णय घेऊ, असेही महेता यांनी सांगितले.

यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीवकुमार, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मिटकर व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages