महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व नागरी सेवा - सुविधांसह महानगरपालिका प्रशासन सुसज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2018

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व नागरी सेवा - सुविधांसह महानगरपालिका प्रशासन सुसज्ज


मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांकरीता बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान राजगृह यासह आवश्यक ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

दादर येथील चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाचे दर्शन घेण्‍यासाठी देशभरातून येणाऱया अनुयायांना आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवाऱयाची सोय म्‍हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्‍या ७ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या असून सुमारे १० हजार अनुयायांची त्यात व्‍यवस्‍था होऊ शकते, अशी माहिती उप आयुक्‍त (परिमंडळ - २) नरेंद्र बरडे यांनी दिली आहे.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्‍यभूमी येथे करण्‍यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवार, दिनांक ५ डिसेंबर, २०१८ रोजी सकाळी १० वाजता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती कक्ष, शिवाजी पार्क मैदान, दादर (पश्चिम) येथे होणार आहे. 

महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) वलोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सुसज्ज आहे.अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले आहे.

महापालिकेकडून देण्यात आलेल्या सुविधा -
- चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्‍यवस्‍था.
- चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.
- १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा.
- शिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फ‍िरती शौचालये (१८० शौचकुपे).
- रांगेत असणाऱया अनुयायांसाठी ४ फ‍िरती शौचालये (४० शौचकुपे).
- ३८० पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था.
- पिण्‍याच्‍या पाण्‍याचे १६ टँकर्स.
- संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था.
- अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.
- चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.
- मोठय़ा पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
- ४६९ स्‍टॉल्‍स् ची रचना.
- दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष / माहिती कक्ष.
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
- स्‍काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था.
- मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्‍छादनाची व्‍यवस्‍था.
- अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था.
- भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे ३०० पॉइंटची व्‍यवस्‍था.
- फायबरच्‍या २०० तात्‍पुरत्‍या स्‍नानगृहाची व ६० तात्‍पुरत्‍या शौचालयांची व्‍यवस्‍था.
- इंदू मिलमागे फायबरच्‍या तात्‍पुरत्‍या ६० शौचालयांची व ६० स्‍नानगृहांची व्‍यवस्‍था.
- रांगेतील अनुयायांसाठी तात्‍पुरते छत असलेल्‍या १५० बाकडय़ांची व्‍यवस्‍था.
- शिवाजी पार्कव्‍यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथेदेखील तात्‍पुरत्‍या निवाऱयासह फि‍रती शौचालये.
- स्‍नानगृहे व पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था.

Post Bottom Ad