मुंबई - देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे फासण्याचा करण्याचा इशारा देणाऱ्या भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कांबळे यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी मात्र काहीही माहीत देण्यास टाळाटाळ करत आहे.
साध्वी यांनी करकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात जोरदार टीका होत आहे. तसंच त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी अनेकांनी केली आहे. अशातच भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी साध्वी यांच्या चेहऱ्याला काळे फासणाऱ्याला भीम आर्मीतर्फे ५ लाखांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात चिरागनगर पोलिसांनी कारवाई केली. सध्या कांबळे यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे. अशोक कांबळे यांना पोलिसांनी राहत्या घरातून आज सकाळी ९ वाजता ताब्यात घेतले. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंडाला काळे फासणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा केली होती.