मुंबई - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील मानखुर्द चिता कॅम्प परिसरात काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचार रॅलीवर गुलाबाच्या पाकळ्या उधळून मुस्लीम बांधवांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार वर्षा गायकवाड आणि माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मंगळवारी चिता कॅम्प परिसरात पदयात्रा आणि प्रचार रॅलींचे आयोजन केले होते. या झंझावाती प्रचार रॅलीच्या वेळी हजारो स्थानिक नागरिक तसेच महिला व युवा वर्ग मोठया संखेने उपस्थित असल्याने परिसरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते.
सत्ताधारी शिवसेना भाजप युतीने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात या भागाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. युती सरकारच्या या सापत्न वागणुकीबाबत या परिसरातील मतदारांच्या मनात प्रचंड संताप आहे. काँग्रेस आघाडीच्या प्रचार रॅलीच्या वेळी अनेक मतदारांनी हीच भावना बोलून दाखवली असून यावेळी शिवसेनेला चांगला धडा शिकवणार असल्याचा मनोदय अनेक मतदारांनी व्यक्त केला. तसेच अभ्यासू, निष्कलंक, प्रशासनाचा अनुभव असलेल्या एकनाथ गायकवाड यांना निवडून दिल्यास संसदेत आपले प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी भावना अनेकांनी या रॅलीदरम्यान व्यक्त केली. परिसरात ठिकठिकाणी काँग्रेसच्या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महिला आणि युवा वर्गाची उपस्थिती लक्षणिय होती.