आयपीएल सामन्यांमध्ये मतदार जनजागृती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयपीएल सामन्यांमध्ये मतदार जनजागृती

Share This

मुंबई, दि. ६ : सध्या आयपीएल क्रिकेट सामन्यांना होणारी गर्दी लक्षात घेता या सामन्यांमध्ये मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेडिओ एफएमचाही वापर केला जाणार आहे.

मतदारांची जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने क्रिकेट नियामक मंडळाला संपर्क करण्याची सूचना महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य निवडणूक‍ कार्यालयामार्फत क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रतिनिधींची भेट घेण्यात आली. त्यांना मतदारांना आवाहन करण्यात येणारे सर्व साहित्य देण्यात आले. ३ एप्रिल २०१९ रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या सामन्याच्या वेळी मतदार जागृतीचे फलक, बॅनर्स स्टेडियममध्ये लावण्यात आले. यापुढील मुंबई येथे होणाऱ्या सर्व सामन्यांच्या वेळी अशाच प्रकारे मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

आयपीएल सामन्यांदरम्यान लोकसभा निवडणुका येत आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची आवश्यकता, मतदान म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य, योग्य उमेदवार निवडून देण्याची शक्ती, लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी मतदानाची आवश्यकता अशा आशयाचे संदेश फलक, एक मिनिटांच्या जाहिराती, बॅनर्स, निवडणूक सदिच्छादूतांमार्फत केलेले आवाहन आयपीएल सामन्यांच्या वेळी प्रक्षेपित केले जातील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages