मुंबई - 'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी घसरलेली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला जनतेने पुन्हा पंतप्रधान करू नये. त्यांचे खासदार निवडून येणार नाही, याची दक्षता लोकांनी घेतली पाहिजे,' असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना 'शरद पवारांनी बारामतीत बऱ्यापैकी काम केले आहे. बारामतीत पराभवाची त्यांची भीती मला खरी वाटत नाही. तिथे सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत,' असा अंदाज आंबेडकर यांनी व्यक्त केला. बारामतीत पवारांचे काम चांगले आहे, असे ते म्हणाले. मात्र, अन्य मुद्द्यांवरून त्यांनी पवारांवर टीका केली. पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरही त्यांनी तोफ डागली. 'दुष्काळी भागाचा दौरा मी देखील केला, पण त्याचे मार्केटिंग केले नाही. मेलेल्या टाळूवरचे लोणी खायची मला सवय नाही. ५० वर्षे ज्यांनी पाणी चोरले, ते आता दुष्काळावर बोलतात,' असा टोला आंबेडकरांनी लगावला.