मुंबई - तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने असह्य उकाड्यामुळे राज्यात १५ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. २४४ जणांना उष्णतेशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच जणांवर राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उपचार सुरू आहेत.
तापमानवाढीमुळे राज्यामध्ये रोगराईचे प्रमाणही वाढत आहे. संसर्गजन्य ताप, पोटदुखी, डोकेदुखी, त्वचाविकारांनी डोके वर काढले आहे. कडक उष्म्यापासून बचाव करण्यासाठी सर्वसामान्यांनी दुपारी बाहेर पडू नये, असे आवाहन वैद्यकीयतज्ज्ञांनी केले आहे. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना उन्हाळ्यामध्ये उष्मादाह होण्याचा त्रास तत्काळ होऊ शकतो. राज्यामध्ये अशा २४४ जणांना उष्णतेशी संबधित विविध प्रकारचे आजार झाले होते.
मुंबईमध्ये तापमान पूर्वीपेक्षा स्थिर झाले आहे, मात्र तरीही सर्वसामान्यांना कडाक्याच्या उष्म्यापासून दिलासा मिळालेला नाही. हवेतील आर्द्रता अधिक असल्यामुळे उन्हाळा सुसह्य झालेला नाही. तापमानातील आद्रतेचे प्रमाण वाढले की अस्वस्थताही वाढते. मुंबईमध्ये समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. एरवी ४० ते ५० टक्के असणारे आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके झाले आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी हे प्रमाण ८० ते ९० टक्के इतकेही आहे.