मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात साधारणतः एक ते पाऊण तास ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेली ही भेट म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठीच्या तयारीचा एक भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. लोकसभेत आलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२८ मे) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली संयुक्त बैठक झाली. या बैठकीत लोकसभेत आलेल्या पराभवामागची कारणे आणि विधानसभेची तयारी यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सर्व राजकीय नेत्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, या बैठकीत मनसेबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे देखील सांगण्यात आले होते.