मुंबई -- भेंडी बाजार परिसरातील बोहरी मोहल्ल्यातील पंजाब महल या पाच मजली इमारतीत शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. यात ११ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यांत चार अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. दरम्यान तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
भेंडीबाजारातील दाटीवाटीच्या परिसरातल्या या पाच मजली इमारतीत चौथ्या व पाचव्या मजल्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र काही क्षणातच आगीचा भडका वाढला. अग्निशमन दलाने ११.२३ च्या सुमारास श्रेणी-३ची आग जाहीर केली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु केले. वर्दळीचा रस्ता, अरुंद गल्ल्या यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या. अखेर पहाटे तीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत फरिदा मास्टर (६०) आणि नफिसा गीतम (६०) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. यात चार अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश असून त्यांना धुराचा त्रास झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीचा भडका क्षणा क्षणाला वाढल्याने संपूर्ण इमारतीत धूर पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला अडचणी आल्या. तब्बल चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
जखमींची नावे --
चंद्रशेखर गुप्ता ( ३६) आणि पुंडलिक मांडे ( २७), रमेश सरगर (३५) गोपाळ विठ्ठल पाटील (हे चौघेही अग्निशमन दलाचे जवान आहेत), ताहिर नळवाला ( ७२), मुस्तफा सोनी (४२), फरिदा छित्तरवाला (५२), सैफुद्दीन छित्तरवाला (६२), बुहराद्दीन होटलवाला (२९) मुस्तफा हॉटेलवाला ( ४६) आणि अली असगर ( ३२) या रहिवाशांना धुराचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.