मुंबई - मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आयुक्त अजोय मेहता दुजाभाव करत आहेत, पालिका आयुक्त मागासवर्ग विरोधी असल्याचा स्पष्ट आरोप बृहन्मुंबई महानगरपालिका एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस संजय कांबळे - बापरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बापरेकर म्हणाले की, पालिकेतील मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र त्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने आम्हाला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागावी लागली. आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा मुंबईला भेट देऊन बैठका आयोजित केल्या. मात्र त्या बैठकांकडे आयुक्तांनीच पाठ फिरविली. जे अधिकारी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही अशा कनिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकांना पाठविण्यात आले. बापरेकर यांनी यावेळी पदोन्नतीत अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांची यादीच सादर केली.
या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर आयोगातर्फे आता दिल्लीतच 29 मे 2019 रोजी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नीबाबत सुनावणी घेण्यात येणार आहे. त्या सुनावणीसाठी आयुक्तांना पाचारण करण्यात आले आहे. यावेळी तरी आयुक्तांनी उपस्थित राहून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला करावा, अशी अपेक्षा बापरेकर यांनी केली आहे.